नाशिक : पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सद्दी संपवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतल्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले आहेत.

छगन भुजबळांसाठी जे काय करायचं होतं ते पक्षाने केलं आहे. मात्र जनभावनेचाही विचार करावा लागतो. म्हणूनच भुजबळांचे फोटो कार्यकर्त्यांनी बॅनर्सवरुन हटवल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बुधवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. तसंच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पक्षाला आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दौऱ्यावेळी पक्षाने बॅनर्सवरुन भुजबळांची गच्छंती केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीच्या निवड समितीवरही भुजबळ समर्थकांना टाळण्यात आल होतं.

यावेळी अजित पवारांना याबाबत विचारलं असता, त्यांनी अप्रत्यक्षरित्या भुजबळांची राष्ट्रवादीमधील सद्दी संपल्याचे संकेत दिले.

नाशिकमध्ये एकट्या दुकट्याच्या हातात सूत्र दिल्याने 15 वर्षात पक्षाचं अतोनात नुकसान झाल्याचं सांगत अजित पवारांनी भुजबळांवर नाराजी व्यक्त केली. तसंच यापुढे सामूहिकपणे निर्णय घेण्याचं पक्षाने ठरवल्याचंही अजित पवार म्हणाले.