नागपूर : मेरिटमध्ये येऊनही ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससीने नोकरी नाकारली, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी मांडली आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भुजबळ सभागृहात प्रश्न उपस्थित करणार आहेत.

विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षा देऊन ते मेरिटने पास झाले. यादीत त्यांचं नाव आलं. मात्र नोकरी देताना त्यांची धनगर, माळी, कुंभार, सोनार अशी जात पाहिली आणि खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिली असल्यामुळे नोकरी नाकारली. हायकोर्टाच्या आदेशानुसार कुणीही खुल्या प्रवर्गातून परीक्षा देऊ शकतो, त्यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा, असं भुजबळ म्हणाले.

दरम्यान, विविध मुद्द्यांवरुन भुजबळ यांनी सरकारवर निशाणा साधला. किसान मोर्चा असो, किंवा सरकारवर वाढलेलं कर्ज असो, या सर्व मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करणार असल्याचं भुजबळांनी सांगितलं.

शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. पाय रक्ताळले. एका महिन्यात कारवाई करु असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. पण आतापर्यंत काहीही केलं नाही, असं भुजबळ म्हणाले.