अहमदनगर : जिथं ओबीसी लोक राहतात, तिथं दहशत निर्माण केली जात आहे, त्यांना मारहाण केली जात आहेत. लोक गाव सोडून जात आहेत, असा दावा छगन भुजबळ यांनी केला. अहमदनगरमध्ये ओबीसी मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला. आपण 16 नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर 17 नोव्हेंबरला अंबडच्या रॅलीला हजेरी लावली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वाच्यता करू नये, असे सांगितल्याने मी अडीच ते तीन महिने शांत राहिलो, असा दावाही यांनी ओबीसी रॅलीतून केला. भुजबळ यांनी राजीनामा पक्षाकडे सादर केला की मुख्यमंत्र्यांकडे दिला? याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही. या मेळाव्यातून ओबीसीसाठी लढणार असल्याचे सांगितल्याने मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा थेट सामना होण्याची चिन्हे आहेत.
मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते, काय बोलतो तुमचा नेता?
छगन भुजबळ म्हणाले की, मराठा आमदारांना मते मिळणार नाही म्हणून मराठा आमदार घाबरतात. आमचे लोक रॅलीला येत नाही पण मतदान करत नाहीत. निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये आरक्षणावर बोलल्या नाहीत, मला वाईट वाटले. मराठा समाजाच्या नेत्यांची कीव येते, काय बोलतो तुमचा नेता? जरांगे यांनी मला बजेटमधील फारसं कळत नाही, पण आरक्षण देता येत असल्यास द्यावे, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याची भुजबळांनी ओबीसी रॅलीतून खिल्ली उडवली.
त्यांनी पुढे सांगितले की, न्हावी समाजाच्या दुकानात जायचं नाही, असं ठरवलं आहे. सर्व नाभिक समाजाने सुद्धा एकही मराठा समाजाची भादरायची नाही. आपापसात भादरवून टाका म्हणावे. फडणवीस साहेब तुमचा खात्याचा भेदभाव चांगला नाही. रात्री दोन ते तीनवाजेपर्यंत सभा हे काय सुरू आहे, असेही ते म्हणाले. गावागावांमध्ये ओबीसींना त्रास दिला जातो तक्रार होत नाही.
एका बाजूने ओबीसी आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोग संपवायचा, अरे मंडल आयोग गेला तर हे आरक्षण राहील का? असा सवाल भुजबळ यांनी जरांगे यांनी केला. माळी साळी असे भेदभाव सोडून सर्वानी एकत्र राहिलं पाहिजे.
तर परत उपोषण कशासाठी? छगन भुजबळांचा मनोज जरागेंना सवाल
छगन भुजबळ म्हणाले की, नाभिक समाजाच्या कर्पुरी ठाकुरांना भारतरत्न दिला, यासाठी पीएम मोदींचे अभिनंदन करतो. मोदींनी ओबीसी ऋण मान्य केलं. ते पुढे म्हणाले की, 27 तारखेला गुलाल उधळला, तर परत उपोषण कशासाठी? अशी विचारणा भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. अध्यादेश कळत नाही, अधिसूचनेचा मसूदा कळत नाही आणि म्हणतात आरक्षण मिळालं, अशी टीका त्यांनी केली.
तर मागासवर्गीय आयोग कशासाठी?
मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही 27 तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांनाच आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या