नाशिक: विखे पाटलांना जर आपला राजीनामा हवा असेल तर त्यांनी तो त्यांच्या नेत्यांना सांगावा, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचं वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी वाद हा निरर्थक असून भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) केली होती. त्यानंतर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली.


छगन भुजबळ म्हणाले की, विखे पाटील हे आपले मित्र आहेत. त्यांना आपला राजीनामा हवा असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांना तसं सांगावं. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं तर आपण राजीनामा देऊ.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांना काही निर्देश दिल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावर बोलताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुणीही आपल्याला तंबी वगैरे दिली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


मतदारसंघात जोपर्यत आमदार, तोपर्यंत येणार


मी नाशिक जिल्ह्याचा आमदार असल्याने या ठिकाणी येणार असं सांगत भुजबळ म्हणाले की, "नाशिकला अवकाळी पावसाचा फटका बसला. नाशिकचे कार्यकर्ते मला बोलवत होते, मला मेसेज येत होते. आजच्या कॅबिनेटमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली. त्यामध्ये कांदा उत्पादक तसेच द्राक्षे उत्पादक शेतकरी यांना मदत करण्याची भूमिका मी मांडली. द्राक्ष उत्पादकांना जर मदत केली नाही तर ते तीन चार वर्षे उभे होणार नाहीत."


भुजबळांनी राजीनामा द्यावा, विखे पाटलांची मागणी


राज्याचे मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावरून भुजबळांवर टीका केली होती. ते म्हणाले की, विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण केला जात असून ओबीसी विरुद्ध मराठा सुरू असलेला वाद हा निरर्थक आहे. छगन भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोक आदराने बोलत आहेत. नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. त्यांच्या वक्तव्यामुळे सरकारमध्ये एक वाक्यता नाही असा मेसेज जातो. त्यामुळे सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते. भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे. नाहीतर त्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. 


ही बातमी वाचा: