Milk Price : दुधाला 34 रुपये भाव (Milk Price) मिळावा या मागणीसाठी, गेल्या 7 दिवसांपासून जनसंघर्ष समितीच्या वतीनं अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले येथे शेतकऱ्यांचे (Farmers) आमरण उपोषण सुरु होते. आज अखेर या आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आलं आहे. दूध दराच्या बाबतीत कोणताही तोडगा निघालेला नाही. फक्त बैठकीचं आश्वासनं देण्यात आलं असल्याची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी दिली आहे.


दुध दराच्या प्रश्नासंदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत अधिवेनाअगोदर बैठक होणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या मध्यस्थीने उपोषण  स्थगित करण्यात आलं आहे. संदीप दराडे आणि अंकुश शेटे यांनी सात दिवस आमरण उपोषण केलं. तर अजित नवले हे देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठई उपोषणाला बसले होते. त्यांनी चार दिवस आमरण उपोषण केलं. 


काय केल्या मागण्या?


आमरण उपोषण मागे घेतल्यानंतर डॉ. अजित नवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बैठका घेण्याचा फार्स करण्यापेक्षा तातडीने शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 ते 10 रुपयांचे अनुदान द्यावे. तसेच दूध पावडर निर्यातीसाठी केंद्राकडून परवानगी घ्यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी डॉ. अजित नवले यांनी केल्या आहेत. 


आश्वासनापेक्षा सरकारनं निर्णय घ्यावा


सहकाऱ्यांची तब्बेत लक्षात घेता आमरण उपोषण मागे घेणं गरजेचं होते, असे अजित नवले म्हणाले. सरकारनं बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. आश्वासनापेक्षा निर्णय घ्या असे अजित नवले म्हणाले. दरम्यान, आमरण उपोषणाला बसलेल्या सहकाऱ्यांचे अजित नवले यांनी स्वागत केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रक काढून उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत शरद पवारांचे बोलणे महत्वाचे असल्याचे नवले म्हणाले. त्यामुळं याबाबत काही हालचाली होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत बैठका होतच राहतील पण बैठकांसाठी थांबण्याची गरज नसल्याचे नवले म्हणाले.


दुधाचे दर कोसळले, शेतकरी हवालदिल


दुधाचे दर कोसळल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने 34 रुपये दर देण्याचा आदेश देऊनही सहकारी आणि खासगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास 22 नोव्हेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला आहे. त्यामुळं सरकारनं तातडीनं याबाबत निर्णय घेणं गरजेचं असल्याचे नवले म्हणाले.  दुधाला 34 रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दरात रिव्हर्स दराची मेख मारुन दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसवण्यात आला आहे. 34 रुपयांऐवजी बेस रेट 27 रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला असल्याचे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले.  


महत्त्वाच्या बातम्या:


दूध दराच्या प्रश्नावर तोडगा निघणार कधी? अकोल्यात आमरण उपोषण, सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप