मुंबई : 35 वर्षापासून मी ओबीसीसाठी काम करतोय, त्यामुळे मंत्रीपदाच सोडा आमदारकीचं पण सोयर सुतक मला नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एबीपी माझाला दिली आहे.  ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) राजीनामा देखील देण्यास तयार असल्याची भूमिका वारंवार छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणातून बोलून दाखवलीये. त्यामुळे भुजबळ हे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजीनामा देखील देऊ शकतात, अशा चर्चा होत्या. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला, तसंच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला छगन भुजबळांचा विरोध आहे. भुजबळ समता परिषदेच्या माध्यमातून आपला विरोध वेळोवेळी बोलून दाखवत आहेत.


आमचा संघर्ष मराठा समाजाबरोबर नाही, सुरुवातीपासूनच मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असंही भुजबळ यावेळी म्हणालेत. बीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या अधिसूचना काढण्यात आल्या आहेत, या विरोधात आणि सरकारच्या  विरोधात आजही भुजबळ हे आक्रमक आहेत. राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागल्यानंतर मनोज जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठा आरक्षण हंव ही भूमिका घेतली. पण ओबीसीतून मराठा आरक्षण घेऊ देणार नाही, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. 


मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेतलं नाही


मुख्यमंत्री शिंदे यांनी 27 जानेवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश स्वत: मनोज जरांगे यांच्या हाती सुपूर्द केला. त्यावेळी जोपर्यंत सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत ओबीसीतून मराठा समाजाला सवलती मिळतील, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावर छगन भुजबळांनी नाराजी दर्शवत मुख्यमंत्र्यांना मला विश्वासात घेतलं नाही. कदाचित त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. 


ओबीसी समाजाचं वाटोळं झालंय


दरम्यान मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावरुन बरचं घमासान सध्या सुरु आहे. तसेच ओबीसी समाजाने या आरक्षणावर आक्षेप देखील घेतला. मराठा आरक्षण टिकणार नाही, असा दावा देखील ओबीसी नेत्यांकडून वारंवार केला जातोय. यावर भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाचं चांगलं झालंय आणि ओबीसी समाजाचं वाटोळं झालं आहे. 


1 फेब्रुवारीला सर्व आमदार, खासदारांच्या घरावर तसेच तहसील कार्यालयांवर आम्ही आंदोलनं करणार आहोत. त्याचप्रमाणे 3 फेब्रुवारीला नगरमध्ये सभा होईल. 17 तारखेपर्यंत हरकती मोठ्या प्रमाणात देऊ. ओबीसी एल्गार आणि महाराष्ट्र यात्रा आम्ही काढणार असून याबाबत मराठवाड्यात चर्चा सुरु असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.  



ही बातमी वाचा : 


राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती