Chhagan Bhujbal : राजसाहेबांचे कळतच नाही, ईडीमध्ये बोलावल्यानंतर इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले, त्यांचा कोहिनूर टॉवर एकदम हालायलाच लागला. या आधी राज ठाकरेंनी कडवा विरोध भाजप विरोधात केला होता. पण काल त्यांनी अचानक टर्न घेतला, राज ठाकरेंनी माझ्यावर पण टीका केली पण मी मोदींवर टीका करतच होतो, असा ट्रॅक कधी बदलला नाही. त्यामुळे मला राष्ट्रवादीने बक्षीस म्हणून शपथविधीला पहिले पाचारण केले. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर केलीय. 


राज ठाकरेंनी प्रांतवाद वाढवला
बीजेपीची बी टीम म्हणून त्यांना काम करायचं असेल तर जाहीर करावं, असं आडमार्गाने टीका करण्यात अर्थ नाही, जातीवाद, धर्मवाद कोणी कोणी वाढवला याचा हिशोब मोठा होईल, राज ठाकरेंनी प्रांतवाद वाढवलाच, कल्याणला परीक्षा द्यायला आलेल्या युपीच्या लोकांना कोणी पळवले. ते बोलतात, चांगलं म्हणून लोक त्यांना ऐकायला जातात, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कळत नाही की आपल्या इंजिनाचे तोंड उत्तरेला आहे की पूर्वेला अशी प्रतिक्रिया देत  भुजबळांनी राज ठाकरेंवर टीका केलीय.


मशिदीच्या भोंग्याबाबत भाजपला कायदा करायला सांगा


तुमचे किती नगरसेवक, आमदार, खासदार आहे? देशात मशिदीच्या भोंग्याबाबत भाजपला कायदा करायला सांगा, महाराष्ट्रात पण त्यांनी सरकार असतांना केले नाही.. मुंबईत ते भाजप सोबत येऊ शकतात. फक्त भाजप त्यांना घेते की नाही हे बघावे लागेल, ईडीने त्यांना वेगळं ट्रॅकवर नेलय अशी टीका भुजबळांनी राज ठाकरेंवर केलीय.


शिवसेना, राष्ट्रवादींवर राज ठाकरेंचे टीकास्त्र


दरम्यान राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केला. शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादींवर टीकास्त्र सोडलं. तसेच मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला. आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता, असेही राज ठाकरे म्हणाले. आधी जात जातीचा अभिमान होता, राष्ट्रवादीने जातीय वाद पेटवला. जातींमधून बाहेर आले तर हिंदुत्वचा ध्वज हाती घेता येणार आहे, असे टीकास्त्र राज ठाकरेंनी सोडलं.


...त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं


1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले.  बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते काही म्हणाले की ते ब्राम्हण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची, असेही राज ठाकरे म्हणाले.