प्रमुख मागण्या
1) बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळांना सोडा,
2) ओबीसी नेत्यांचं खच्चीकरण थांबवा
3) ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका
या प्रमुख मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत.
विजय माल्याचं काय केला?
या मोर्चासाठी विविध जिल्ह्यातून अनेक भुजबळ समर्थक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. छगन भुजबळांना जेलमधून सोडा ही त्यांची प्रमुक मागणी आहे. विजय माल्या 9 हजार कोटींचा घोटाळा करुन गेला, त्याला सरकार काहीही करु शकलं नाही. मात्र भुजबळांवर 870 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांना जामीन न देता, केवळ सूडाचं राजकारण म्हणून अडकवून ठेवल्याची प्रतिक्रिया समर्थकांनी दिली.
ओबीसीमधून अन्य समाजाला 1 टक्का आरक्षण देऊ नका
सध्या मराठा समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत. मात्र ओबीसीमधून कोणत्याही समाजाला 1 टक्काही आरक्षण देऊ नये, अशी मागणीही यावेळी भुजबळ समर्थकांनी केली.
भुजबळांना लवकरात लवकर सोडावं, अन्यथा त्याचा परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा यावेळी समर्थकांनी दिला.
ओबीसी एकवटले
संपूर्ण ओबीसी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे. जागोजागी भुजबळांचे बॅनर्स, समर्थनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
या मोर्चादरम्यान एक गोष्ट समोर येताना दिसतेय, ती म्हणजे एकेकाळी स्वतःला भुजबळांचे समर्थक म्हणवून घेणारे राष्ट्रावादीतले काही चेहरे तयारी कामात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे आजच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या समर्थनार्थ उतरते की आताही भुजबळांना एकटीच पाडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.