शिर्डी : साई बाबांच्या शिर्डीच्या भगवेकरणाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा निर्णय शिर्डीतील ग्रामस्थांच्या आणि विश्वस्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 'एबीपी माझा'नं या संदर्भातलं वृत्त दाखवल्यानंतर भक्तांचा ओघ कमी होऊ नये, शिर्डीच्या भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आश्वासन 'एबीपी माझा'च्या विशेष कार्यक्रमामध्ये देण्यात आलं आहे.
शिर्डीतील साई मंदिरातील सगळे फलक हे भगवे झाले असून, साईंची प्रतिमा हिंदुत्त्ववादी करण्याचा घाट मंदिर संस्थानने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर एबीपी माझाने या बातमीचे प्रसारण करताच आज संध्याकाळी विश्वस्त आणि ग्रामस्थांची बैठक झाली आणि त्यात फलकांबाबतचा निर्णय तातडीने घेऊन कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिस्ती जाती-धर्मापलिकडे जाऊन मानवतावाद शिकवणारा संत अशी साईंची ओळख आहे. मात्र तेच साई बाबा फक्त हिंदूंचे होते, असा दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. साईंची द्वारकामाई मशीद म्हणून ओळखली जायची. मात्र तो फलक बदलून, त्यावर फक्त द्वारकामाई इतकाच उल्लेख करण्यात आला आहे.
शिर्डी साई मंदिरातील नोटीस बोर्ड, दिशादर्शक फलक, बुकिंग काऊंटर किंवा मंदिरातले साईन बोर्ड्स सगळीकडे भगवा रंग देण्यात आल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं होतं. तर साई शतकमहोत्सवाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या स्तंभावरही ओम, त्रिशूळ अशी हिंदू धर्माची प्रतिक विराजमान केली आहेत.
या सर्व प्रकारामुळे साईंनी सर्वधर्म समभावाची शिकवण देताना सब का मालिक एकचा नारा दिला होता. तो नाराच आता शिर्डीतून पुसला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.