बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करा, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे  अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. नामकरण न केल्यास मोठे आंदोलन करण्याचा इशारा देखील मेटे यांनी दिला आहे.


येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊ यांची जयंती असून याच पार्श्वभूमीवर सरकारने बुलडाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर असे करावे अशी मागणी मेटे यांनी केली आहे. जालना येथे पत्रकारांशी बोलताना सरकारने हे नामकरण न केल्यास आपण या मागणीसाठी मोठे आंदोलन उभारू असा इशारा देखील त्यांनी दिला.

दरम्यान आम्ही मंत्रीपदाची वेळोवेळी मागणी करून देखील सरकारने दुर्लक्ष केल्याने सरकार विरोधात आमची नाराजी असल्याच देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

पक्षात मिळणाऱ्या चुकीच्या वागणुकीमुळे नाराज असलेल शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही महायुतीमध्ये आलो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याचे मेटे यांनी सांगितले होते.  महायुतीमध्ये सत्तेत असतानाही मागच्या चार वर्षांमध्ये मेटेंना भाजपने मंत्रीपद दिले नसल्यामुळे ते नाराज आहेत. त्यांची नाराजी याआधी अनेक वेळा समोर आली आहे.

विनायक मेटे हे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत.