Chandrashekhar Bawankule : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) नुकतीच महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. राज्यातील पाच जिल्ह्यातून या यात्रेचा प्रवास झाला आहे. या यात्रेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. राहुल गांधींच्या यात्रेचा भाजपने चांगलाच धसका घेतल्याचे दिसत आहे. कारण भारत जोडो यात्रा गेलेल्या जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी फिरणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. येत्या आठ डिसेंबरपासून मी दौरा करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 


राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि शेवटी बुलढाणा या पाच जिल्ह्यातून गेली. बुलढाण्यातून ही यात्रा आता मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. आता राहुल गांधी येऊन गेलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपने विशेष रणनिती आखली आहे. या पाच जिल्ह्यात आठ डिसेंबरपासून स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरपासून मैदानात उतरणार आहेत. सोलापूरपासून नांदेड, हिंगोली, वाशिम आणि शेगावपर्यंत बावनकुळे संघटनात्मक बांधणीसाठी फिरणार आहेत. राहुल गांधी गेले म्हणून मी जाणर आहे असे नसल्याचे बावनकुळे म्हणाले. माझा दौरा हा संघटनात्मक बांधणीसाठी असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर त्या त्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेसमधील लोक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. भारत जोडो यात्रा ही नेत्यांनी हायजॅक केली. मात्र, सामान्य कार्यकर्ते यात्रेपासून दूर राहिल्याचे बावनकुळे म्हणाले.


प्रत्येक जिल्ह्यात 14 तासांचा वेळ


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांसाठी 14 तासांचा वेळ देणार आहेत. यामध्ये संघटनात्मक बाबीसंदर्भात ते चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात बावनकुळे संबंधित जिल्ह्याचा संपूर्णपणे आढावा घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेचं काहीही फलित झालेला नाही हे आम्ही दाखवून देऊ असेही बावनकुळे म्हणाले. माझ्या या दऱ्यात काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये इन्कमिंग होईल असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काहीही प्रभाव पडला नाही हे त्या इनकमिंगमुळं दिसून येईल असेही बावनकुळे म्हणाले.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक 


सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्यांचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तशी स्थिती तयार झाल्याचे बावनकुळे म्हणाले. सध्या आम्ही बुथ पातळीवरचे आणि जिल्हा पातळीवरचे कार्यकर्ते घेत आहोत. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा मोठे पक्ष प्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट होताना दिसतील, त्यावेळी तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बावनकुळे यांनी काँग्रसचे नेते जयराम रमेश यांच्यावरही जोरदार टीका केली. जयराम रमेश यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याचेते म्हणाले. सावरकर कोणत्या पक्षाचे होते का? त्यांनी देशासाठी संपूर्ण आयुष्य दिलं. सावरकरांना एका पक्षाशी जोडणं म्हणजे लाजिरवाणं वक्तव्य असल्याचं बावनकुळे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Rahul Gandhi : भाजप हिंसा, द्वेष, दहशत पसरवतंय, याविरोधातच भारत जोडो यात्रा; राहुल गांधींचा शेगावात हल्लाबोल