वर्धा :  माणूस जेव्हा संपतो तेव्हा काही धडपड शरीरात तयार होते. आता शरद पवारांची ही शेवटची धडपड आहे, अशी बोचरी टीका ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.  शरद पवार पत्रकारावर भडकल्याच्या विषयावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही टीका केली आहे. ज्या पद्धतीने जनतेने त्यांना नाकारले आहे. ते त्यांना आता कळलं आहे. विरोधी पक्षाचा नेताही ते आता तयार करू शकणार नाही. संविधानामध्ये पत्रकार हा महत्वाचा बिंदू आहे. पत्रकारांवर भडकून लोकशाही चालत नाही. पवारांकडून असं अपेक्षित नाही, असे बावनकुळे म्हणाले.


चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. त्यावेळी बावनकुळे यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी वाबनकुळे यांना शरद पवार पत्रकारावर भडकल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मंत्री बावनकुळे म्हणाले, कुणावर भडकून पत्रकारांवर भडकून लोकशाही कधी चालत नाही. पत्रकारांना संविधानाने  पत्रकारावर भडकून आपला रोष काढता येईल.  ते पत्रकारांवर राग काढत आहेत. त्यांच्याकडून असे अपेक्षित नाही, असेही मंत्री बावनकुळे यावेळी म्हणाले.

समृद्धी महामार्गाकरीता मोठ्या प्रमाणात विनापरवानगी उत्खनन झाल्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी जिल्हाधिकारी यांनी केली आहे. कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या अमलात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही प्रमाणात जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत कारवाई प्रस्तावित केली आहे, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते पक्षाला रामराम करत भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. या नेत्यांमध्ये पद्मसिंह मोहिते पाटील यांचाही समावेश आहे. एका पत्रकाराने पद्मसिंहांबद्दल प्रश्न विचारला असता काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भडकले होते. "नातेवाईकांचा आणि ह्याचा काय संबंध?", असं म्हणत भर पत्रकार परिषदेतून जाण्यासाठी निघाले होते. अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला होता.

"नेते पक्ष सोडत आहेत मात्र आता नातेवाईकही दूर जात आहेत," या प्रश्नावर शरद पवार भडकले होते. "नातेवाईकाचा आणि या काय संबंध? पण तुम्ही नातेवाईकाचा काय विषय काढता? हे चुकीचं बोलताय तुम्ही, नातेवाईकाचा संबंध आहे का इथे राजकारणात? हे बघा, हे असं बोलायचं असेल, तर मला बोलायचंच नाही," असं म्हणत पवार जाण्यासाठी उठले होते.  यानंतर पवारांनी पत्रकाराला माफीही मागायला लावली. पवार पुढे म्हणाले की, "अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही. माझी विनंती आहे, अशा लोकांना बोलवत जाऊ नका, निदान मला. यांना बोलवणार असाल, तर मला बोलावू नका. आपण निघून गेलात तर बरं होईल.", असे ते म्हणाले.