खर्रा-10 रुपयांचं आमिष, चंद्रपुरात 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2018 02:18 PM (IST)
दोन्ही वेगवेगळ्या घटना असून एकाच दिवशी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चंद्रपूर : चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुलींवर शाळेजवळील प्रसाधनगृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खर्रा आणि दहा रुपयांचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात विसापूर या गावात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शाळेच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहात हा प्रकार घडला. या दोन्ही वेगवेगळ्या घटना असून एकाच दिवशी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. 20 वर्षीय सूरज हनवते आणि 50 वर्षीय लालाजी पिंगळे अशी आरोपींची नावं आहेत. पीडित मुलींनी पोटात दुखत असल्याची तक्रार पालकांकडे केल्यावर वैद्यकीय तपासणीत ही बाब समोर आली. त्यानंतर या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींनी या मुलींना शाळेतून बाहेर बोलावून हा प्रकार केल्याने पोलिस चक्रावले आहेत. या आरोपींनी असाच प्रकार आणखी कुणासोबत केला का, याचा तपास पोलिस करत आहेत. घडलेल्या प्रकारानंतर विसापूर गावात तणावाची स्थिती आहे. स्थानिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.