चंद्रपूर : एसटीखाली चिरडून तिघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत बसमधील दहा प्रवासीही जखमी झाले आहेत. चंद्रपुरातल्या गोंडपिंपरीमधील विठ्ठलवाडा बसस्थानकावर हा अपघात झाला.
हैदराबादहून अहेरीला येणाऱ्या हिरकणी एसटी बससमोर अचानक दुचाकीस्वार आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटीचालकाचं भरधाव बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने चबुतऱ्यावर बसलेल्या तिघांना चिरडलं.
मृतांमध्ये 65 वर्षीय केशव कुडे, 60 वर्षीय वच्छला तंटकवार आणि 16 वर्षीय रितिक कुंदोजवार यांचा समावेश आहे. तर बसमधील दहा प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसचालकानं पळ काढला. याप्रकरणी गोंडपिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.