मुंबई : 1 जुलैचा दिवस उजाडला, तोच जीएसटी ही नवी करप्रणाली देशात लागू झाल्याची बातमी घेऊन. जीएसटीमुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत, तर काही महाग. तुमच्या दैनंदिनीवर साहजिकच काहीसा परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानुसार चष्म्याचा नंबर बदलल्यानंतर सुरुवातीला जसं वाटतं, तसंच काहीसं घडेल. मात्र याशिवाय आज कोणकोणते बदल झाले आहेत, त्यावर एक नजर टाकुया.


पासपोर्टसाठी आधार कार्ड बंधनकारक

नव्याने पासपोर्ट काढण्यासाठी आजपासून आधार कार्ड आवश्यक असेल. आधार कार्ड नसेल तर तुम्हाला पासपोर्ट काढता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला परदेशवारी करायची असेल, तर पासपोर्टआधी आधार कार्ड काढणं तुम्हाला बंधनकारक ठरणार आहे.

रिटर्न फाईलसाठी आधार आवश्यक

पॅनकार्ड आधार कार्डाशी लिंक करणं बंधनकारक आहे. एकापेक्षा अधिक पॅनकार्ड काढणं, करचोरी याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्यानंतर देशातील सामान्य नागरिकाद्वारे खर्च होणाऱ्या पैशांचा संपूर्ण आकडा आयकर विभागाकडे पोहचेल. यामुळे करासंबंधित नवे नियम आणि कायदे बनवता येतील, जेणेकरुन देशात टॅक्स बेस वाढवण्यास मदत होईल.

देशात पॅन कार्ड धारकांची संख्या 25 कोटी आहे, तर 111 कोटी लोकांना आधार कार्ड क्रमांक देण्यात आला आहे. यापैकी केवळ 2.87 नागरिकांनी 2012-13 दरम्यान कर भरला होता. या 2.87 कोटी नागरिकांमध्ये 1.62 कोटी लोकांनी टॅक्स रिटर्न दाखल केलं, पण एक रुपयाचाही कर भरलेला नाही. लोक मोठ्या संख्याने करचोरी करतात किंवा कर देण्याचं टाळतात.

पीएफच्या व्याजदरात कपात

नॅशनल सेव्हिंग स्कीम आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सारख्या बचत योजनांच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. नॅशनल सेव्हिंग स्कीमचा व्याजदर 7.9 टक्क्यांवरुन 7.8 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तर पीपीएफचे व्याजदर 8.4 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत.

कमी करण्यात आलेले हे दर 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी लागू असतील. म्हणजेच 30 जूनपर्यंत या बचत योजनांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेवर जुना व्याजदर मिळेल. तर 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर घटवण्यात आलेला व्याजदर मिळेल.

शिष्यवृत्तीसाठी आधार हवंच

केंद्र सरकारच्या वतीनं आधार कार्डाचा वापर सर्व सरकारी योजनांसाठी करण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेसाठीही विद्यार्थांना आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. सरकारी शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यास स्कॉलरशिप मिळणार नाही. यामुळे घोटाळे थांबण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

रेल्वे तिकीटाच्या सवलतीसाठी आधार

रेल्वे तिकीटावर सवलतीचा फायदा घ्यायचा असल्यास आधार कार्ड आवश्यक ठरणार आहे. यामुळे घोटाळेबाजांना चाप बसणार आहे.

पीएफ खातं आधारशी लिंक करा

प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ खातं आधारशी लिंक करणं बंधनकारक आहे. पीएफ सेटल करण्याची प्रक्रिया यामुळे सुलभ होणार अशून योग्य व्यक्तीलाच त्याचं पेमेंट होणार आहे.

आधार शिवाय रेशन नाही

सरकारी दुकानात रेशन घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. खोट्या नावाने रेशनवरील वस्तू सवलतीत घेणाऱ्यांना यामुळे आळा बसेल