ठाण्यात विनोद तावडेंच्या पुतण्याचं लग्नापूर्वी वृक्षारोपण
एबीपी माझा वेब टीम | 01 Jul 2017 11:31 AM (IST)
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रात 4 कोटी वृक्षांच्या लागवडीचा उपक्रम आज राबवण्यात येणार आहे. ठाण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुतण्याच्या लग्नात सात फेऱ्यांआधी वृक्षलागवड करण्यात आली. विनोद तावडेंचा पुतण्या संग्राम तावडे आणि प्राजक्ता जोशी यांच्या लग्नाआधी वृक्षारोपणाचा संकल्प वधू-वराच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याप्रमाणे लग्न लागण्यापूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सरकारच्या वृक्षलागवडीच्या उपक्रमाला मंत्र्यांसह सामान्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करुन वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी 2 कोटी 81 लाख 364 रोपांची लागवड केली. पण त्याचं पुढं काय झालंय, याचं वास्तव मोठं भीषण आहे. गेल्या वर्षीच्या 50 टक्के झाडांचा जीव गेल्यानं पुन्हा तेच खड्डे मोठे करुन त्यात गाळ भरण्यात आला. म्हणजे यंदा त्यात खड्ड्यात फक्त नवं रोपटं लावलं जाईल. महाराष्ट्रातलं जंगल झपाट्यानं कमी होत आहे. त्यावर वनमंत्र्यांनी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. ज्याचं कौतुकही झालं. पण ती झाडं जगत आहेत की मरत आहेत याची जबाबदारी कुणाची? की फक्त फोटोसेशनपुरतीच झाडांची लागवड आणि पैशांची माती करायची? याचाही विचार व्हायला हवा.