ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी वादग्रस्त वक्तव्य करून वादाला तोंड फोडलं आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाई थांबववण्यासाठी मला केंद्रीय मंत्र्यांकडून फोन येतात, असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नवीन वाद निर्माण झालाय. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी मी असं वक्तव्य केलंच नासल्यचं सांगत घुमजाव देखील केलाय. त्यामुळे तो केंद्रीय मंत्री नेमका कोण, असा प्रश्न आता निर्माण झालाय. 


सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या आपल्यावर झालेला हल्ला हा अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळेच झाला, या वक्तव्यावरून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिक चिघळला आहे. सोमवारी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काय पत्रव्यवहार केला आहे? तसेच बांधकामं तोडण्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांचे काय आदेश आहेत? या आदेशाची प्रत मिळावी, अशी मागणी त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहात केली. 


यावेळी अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी देखील पत्रव्यवहार केला. मात्र त्यांचे नाव का घेण्यात आले नाही? असा प्रश्न महापौर नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. यावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप महापौरांनी यावेळी केला. महापौरांच्या या वक्तव्यावर आज भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी भूमिका स्पष्ट केली. 


महासभेत भाजपच्याच प्रश्नाला उत्तर देत महापौरांनी अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई थांबवावी यासाठी केंद्रीय मंत्र्यांचा कॉल आल्याचं सांगितलं. हा फोन कोणत्या मंत्र्यांनी केला? त्या मंत्र्यांचं नाव सांगणार नाही, मात्र अनधिकृत बांधकामे वाचवण्यासाठी कोणाचेही फोन आले तरी अशा बांधकामांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचं त्यांनी सभागृहात स्पष्ट केलं. मात्र काल (मंगळवारी) घुमजाव करत मी असं म्हणालो नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास लोकांनी केला, असं सांगून त्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. 


दरम्यान, महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलेला हा केंद्रीय मंत्री कोण? यावर आता वादंग निर्माण झालाय. नक्की महापौरांना कॉल आलेला का? असाही प्रश्न निर्माण झालाय. यावर मात्र महापौर साहेबांनी मूग गिळून बसणंच योग्य समजलं आहे.