मुंबई: राज्यातील एखाद्या धरणावर तयार होणार पहिला सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात साकारला जाणार आहे. 105 मेगावॅट क्षमता असलेल्या हा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाच्या पाण्यावर साकारला जाणार आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. पाण्यावर तरंगणाऱ्या या सौर ऊर्जा प्रकल्पाची किंमत अंदाजे 508 कोटी रुपये असून येत्या 15 महिन्यांत हा प्रकल्प तयार होणार आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणावर 105 मेगावॅटचे तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार असून यासंदर्भात मंगळवारी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 580 कोटी रुपये अपेक्षित असून 15 महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. 7150 हेक्टर इतक्या विशाल क्षेत्रावर हे धरण पसरले असून यातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा करण्यात येतो.


या तरंगत्या सौर ऊर्जा पार्कमुळे इरई धरणाचे होणारे बाष्पीकरण थांबविण्यात मोठी मदत होणार आहे. यामुळे पाण्याची मोठी बचत होईल आणि वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. हा सौर ऊर्जा पार्क धरणाच्या पाण्यावर होणार असल्यामुळे कुठल्याच प्रकारच्या भूसंपादनाची गरज पडणार नाही. या सोबतच चंद्रपूरचं तापमान हे वर्षभरच जास्त असल्यामुळे या प्रकल्पातून शाश्वत वीज निर्मिती होणार आहे. राज्याची वीजनिर्मिती ची गरज पाहता हा एक प्रदूषणविरहित पर्याय म्हणून कौतुकास्पद आहे.


या सौर ऊर्जापार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून भविष्यात पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य ठिकाण ठरणार आहे. या ऊर्जा पार्कचे पर्यटकांना अवलोकन करता यावे यासाठी प्रेक्षक गॅलरी आणि सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात येणार आहे.