नांदेड: कुंटुरकर शुगर्स साखर कारखान्याला दिलेल्या जमिनी परत मिळाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. कारखान्याच्या स्थापनेवेळी दिलेल्या जमिनी कारखान्याचे खाजगीकरण झाल्यानंतर मालकांने स्वत:च्या नावावर केल्या असा आरोप करत या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


जिल्ह्यातील नायगाव येथील जय अंबिका सहकारी साखर कारखाना अर्थात सध्याचा कुंटुरकर शुगर्स अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यास शेतकऱ्यांनी सन 1992-93 ला कारखाना उभारणी करते वेळी आपल्या जमिनी दिल्या होत्या. ज्यात सदर शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यास कुटुंबातील तरुणांना कारखान्यात कामास घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सदर कारखान्याने कारखाना उभारणीसाठी जवळपास 82 हेक्टर म्हणजे 216 एकर जमीन संपादित केली आणि कारखान्यास सुरुवात झाली. 


त्या जमिनीच्या मोबदल्यात कारखान्याने त्या वेळच्या दरानुसार सदर शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही दिला. पण जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना सदर कारखान्यात कामावर घेऊन रोजगार मात्र दिला नाही. दरम्यान, 2013 मध्ये सदर कारखाना अवसानात निघून तो कारखाना मूळ मालक राजेश कुंटुरकर यांनीच खरेदी केला. जय अंबिका सहकारी कारखाना आता कुंटुरकर शुगर्स ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड नावाने पुन्हा सुरू झाला. तर कारखान्याने त्यावेळी ताब्यात घेतलेल्या 216 एकर जमिनी पैकी 60 एकर क्षेत्रावर कारखाना उभा असून उर्वरित 150 ते 200 एकर शेतजमीन कुंटुरकर शुगर्सचे कारखाना मालक राजेश कुंटुरकर यांनी स्वतःच्या नावे केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.


या शेतजमिनी परत मिळाव्या यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. सदर कारखाना परिसरातील जवळपास दहा गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या कारखान्यात गेल्या असून साडे सात हजार शेतकरी सभासद आहेत. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्वच्या सर्व जमीन कारखान्यास दिल्यामुळे अनेकांना भूमीहीन होण्याची वेळ आली आहे. तर कारखान्यात जमीन गेली आणि रोजगारही गेल्याने अनेकांना गाव सोडून पुणे, मुंबई, हैद्राबाद येथे कामासाठी भटकंती करण्याची वेळ आलीय. तर आई बापाने कुटुंबातील शेत कारखान्याला दिल्याने अनेक मुलांनी कुटुंबीयांशी वाद करत आई बापास घराबाहेर हकाललं.


कारखान्याचे मालक राजेश कुंटुरकर यांनी सदर शेतकऱ्यांचे आरोप खोडून काढत संबंधित शेत जमिनीचा मोबदला दिला असल्याचे सांगितले. पण कॅमऱ्यासमोर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे मात्र टाळले.