Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून (Congress) प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून बहुप्रतीक्षित असेलेल्या चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून अनेक नावांची चढाओढ लागली असतांना काँग्रेस नेतृत्व वेगळा तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.
ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, ज्या उमेदवाराचा सर्वे अहवाल सकारात्मक आहे, त्यांच उमेदवारांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न काँग्रेसचा वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देणे काँग्रेसने टाळल्याचे दिसतंय. अशातच आज काँग्रेसच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Constituency) प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची माहिती पुढे आली आहे.
काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?
गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूरमधून काँग्रेसच्या टिकीटावर आपणच उमेदवार असल्याचा दावा प्रतिभा धानोरकर यांनी वेळोवेळी केला आहे. शिवाय प्रतिभा धानोरकर यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्तरावर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात देखील केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत 2014 आणि 2019 प्रमाणे नामुष्की ओढावून घ्यायची नाही, या इराद्याने मैदानात उतरलेल्या काँग्रेस पक्षाकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राज्यात काँग्रेसची लाज राखली होती. मात्र त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे आता या मतदारसंघावर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी आपला दावा केला असून परंपरागत ही जागा आपल्यालाच सुटावी यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे साकडे घातले होते. अखेर काँग्रेसने धानोरकर यांना मैदानात उतरविण्याचे जवळ जवळ निश्चित केले आहे.
वडेट्टीवारांच्या लेकीचा पत्ता कट?
एकीकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले या काँग्रेस मधील दिग्गज नेत्यांना केवळ एका मतदारसंघापूर्ती गुंतवून ठेवण्यापेक्षा नव्या चेहऱ्याची चाचपणी सुरू केली होती. अशातच नाना पटोले हे स्वत: निवडणूक लढविण्यास फारसे उत्सुक नव्हते, तर विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यापेक्षा आपल्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी दिल्ली दरबारी फिल्डिंग लावल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र पक्षाने ज्या उमेदवारामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे, ज्या उमेदवाराचा सर्वे अहवाल सकारात्मक आहे, त्यांच उमेदवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेत वडेट्टीवार यांची मागणी फेटाळून लावत प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर रंगणार सामना
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी असून एक ओबीसी चेहरा म्हणून त्या काँग्रेससाठी संभाव्य विजयी उमेदवार ठरू शकतात. शिवाय, त्या ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी वोटबँक असल्याने त्यांना विजय संपादन करणे अधिक सोयीचे जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे. अशातच आता या मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांची थेट लढत ही भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध होणार आहे. 2019 मध्ये काँग्रेसला केवळ चंद्रपूर मतदारसंघात विजय मिळवणे शक्य झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात जातीचे समीकरण अतिशय महत्त्वाचे ठरणार असून चंद्रपूरकर पुन्हा प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसला साथ देतात की भाजपला, हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या