चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांना लाच घेताना अटक झाल्याने जिल्ह्यातील गृह न्याय विभागात खळबळ उडाली आहे. ढोलेंना 15 हजार रुपयांची लाच घेताना शासकीय निवासस्थानातून एसीबीने अटक केली. मुदतीपूर्वी सुटका झालेल्या एका आरोपीचा पत्ता देण्यासाठी त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात एक आरोपी काही दिवसांपासून जेरबंद होता. काही कारणाने या आरोपीची मुदतपूर्व सुटका झाली. सुटका झालेल्या आरोपीच्या शोधार्थ तक्रारकर्ते कारागृहात पोहचले. बँकेचे समन्स बजावण्यासाठी तक्रारदाराला हा पत्ता आवश्यक होता. यासाठी 25 हजार रुपयांची मागणी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी केली. मात्र 15 हजार रुपयात सौदा पक्का झाला.

कारागृह परिसरात असलेल्या ढोले यांच्या निवासस्थानी तक्रारदार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पंचासह पोहचले. 15 हजार रुपयांची लाच घेताना ढोले यांना शासकीय निवासस्थानातून एसीबीने रंगेहाथ अटक केली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या कारवाईने चंद्रपूर जिल्ह्यातील गृह-न्याय विभागात खळबळ उडाली आहे.

भाईदास ढोले यांच्या कारागृह कार्यालय, निवास आणि मूळ गावी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शोधमोहीम राबवली असून एसीबीची कारवाई वेगवान सुरु झाली आहे.