सोलापूर : शिवसेनेत हिंमत असेल तर पुन्हा महाराष्ट्र विधानसभा निवडणुक झाली तर शिवसेनेने निवडणुक एकटी लढवून दाखवावी असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते. या वेळी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा देखील साधला.


दिल्ली निवडणुकांवरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रातून मधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. याला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, आप मतलबी कोण हे जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा कळेलच. सूर्यावर थुंकण्याला काही अर्थ आहे. तर दिल्ली निवडणुकांबद्दल देखील चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. जणू काय आपण जिंकल्याचा अविर्भावात शरद पवार आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत.

त्यांच्या पक्षाला 0.2% आणि 0.1% मते मिळाली असून भाजपला मात्र 6 टक्के मते जास्त मिळाली असल्याचे पाटील म्हणाले. देशाचं अहित झालं तरी चालेल मात्र भाजप जिंकता कामा नये असे सध्या राजकारण सुरू आहे. जसं काय शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि यांच्यामुळे अरविंद केजरीवाल जिंकले अशा अविर्भावमध्ये बोलत असून दुसऱ्याच्या घरी मुलगा जन्मला म्हणून पेढे वाटण्या सारखं काम हे करत असल्याची टीका असल्याची चंद्रकांत पाटील यांनी केली.

Minister Bungalow | मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी, सर्वाधिक खर्च थोरात आणि भुजबळांच्या बंगल्यावर | ABP Majha


शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी राज्यसभेत मांडलेल्या खासगी विधयेकवर देखील चंद्रकांत पाटील यांनी मत व्यक्त केलं. अनिल देसाई यांनी विधयेक मंडण्याआधी उद्धव ठाकरे यांना विचारलं आहे का? आणि कॉंग्रेसने मुस्लिम लोकांना विचारलं का? आणि जर त्यांनी याला परवानगी दिली असेल तर शिवसेनेने आमच्या सोबत दगा केला असेल तरी आम्ही कौतुक करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाल्यानंतर हिंदू संघटित करावं, भारतीय नागरिकत्व, समान नागरिक कायदा असे विषय होते. समान नागरी कायदा तयार होण्यास असे विधेयक मदत करेल, असे मत चंद्रकांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केलं.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं 31 बंगल्यांसाठी 15 कोटींचा खर्च होत असल्याच्या बतमीवरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. आपण ज्या बंगल्यात पाच वर्षे राहिलो त्यात एकदाही साधी रंगरंगोटी देखील केली नाही. बंगल्याची अवस्था चांगलीच होती. सार्वजनिक पैशांचा हा अपव्यय असून काल पर्यंत आम्ही देखील याच बंगल्यात राहिलो आहोत. बेसुमार खर्च करून काय उपयोग, बंगले दुरुस्त होण्याआधी हे सरकार पडेल अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. तर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्या फक्त अफवा असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.