चंद्रकांत पाटील यांच्या भाषणावेळी गोंधळ होईल म्हणून पंकजा यांनीदेखील परळीत कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना केलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र, अशा वातावरणात देखील आपण का गेलो याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात दिलं. मात्र, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना टोला देखील लगावला. परळीच्या भाषणात पंकजा मुंडे यांनी सांगितलं अनेकांनी बंड केलं आणि त्यांच्यामुळेच इतिहास घडला. मात्र बंड, भांडण हे आपल्या लोकांच्या विरुद्ध करायच्या नसतात आपल्या लोकांसोबत चर्चा करायची असते असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
तसेच पक्षाविरुद्ध कारवाया करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला. अडचणी असतील तर स्थानिक पदाधिकाऱ्यांना बोला. अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल. मात्र, रोज उठून पक्षाविरुद्ध कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही. सध्या वातावरण खूप वेगळे आहे, आपल्याला बक्षिसही मिळेल आणि शिक्षा देखील मिळेल असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत पराभवाबद्दल देखील चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं. दहा-पंधरा जागांनी आपली सत्ता गेली. मात्र, जवळपासपन्नास जागा अंतर्गत धुसफूसीमुळे गमावल्या. शरद पवारांवर ईडीची चौकशी लावल्यामुळे समाज एकवटला आणि त्यांचा विजय झाला असा समज चुकीचा असून आपण एकोप्याने वागलो नाही आणि त्यामुळेच आपला पराभव झाला असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान हे सरकार देखील जास्त काळ टिकणार नाही. मात्र, जितके दिवस ते सत्तेवर राहतील त्या दिवसात महाराष्ट्राची वाट लावतील, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेत्यांची नावे घेताना चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांसाठी माजी मंत्री असा उल्लेख करताच सभागृहात हशा पिकला." काही दिवसासाठीचे माजी सहकार मंत्री, तसेच भावी मंत्री सुभाष देशमुख, जिल्ह्याचे काही दिवसासाठीचे माजी पालकमंत्री तसेच भावी पालकमंत्री विजयकुमार देशमुख" असा उल्लेख करत राज्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्नही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज्यभरात स्थानिक पातळीवरील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्याचाच भाग म्हणून सोलापुरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -
मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार; पकंजा मुंडे यांची पुन्हा एकदा संघर्षाची हाक
राग माणसावर काढा, पक्षावर नको, चंद्रकांत पाटलांकडून खडसे-पंकजांची समजूत काढण्याचा प्रयत्न
Chandrakant Patil I पक्षातील वाद व्यासपीठावर मांडणं अयोग्य - चंद्रकांत पाटील I एबीपी माझा