Chandrakant Patil on Kolhapur Bypolls Result 2022 : कोल्हापूर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या सत्यजित कदम यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत एन्ट्री केली आहे. या निवडणुकीत भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र भाजपच्या हाती निराशा आली आहे. 


यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोल्हापूरची पोटनिवडणूक तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत राहिली. आम्ही एकट्याने 77 हजार मतं क्रॉस केली, तोंडाला फेस आणला.  निवडणूक असते हार जीत ही होत असते.  नागरिकांनी दिलेला मतदारांचा कौल आम्ही मान्य करतो. सत्यजित कदम लढले तर फेस आला मी लढलो असतो तर काय झालं असतं. मी लढलो नाही, त्यामुळे मला हिमालयात जाण्याचा प्रश्न नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही प्रयत्न करण्यात कुठं कमी पडलो नाही.  पैशाचा, दंडुकेशाही आणि जातीचा वापर केला गेला.  माझ्या अंगावर येण्यास देखील हे मागे राहिले नाहीत. आम्ही या निवडणुकीचं विश्लेषण करू. आम्ही ही निवडणूक विकासावर लढलो, बंटी पाटील म्हणतात की ही निवडणूक धर्मावर नेली.  हिंदुत्व हा आमचा अजेंडा नाही श्वास आहे, राजकीय आवश्यकता म्हणून हिंदुत्व वापरत नाही.  हिंदु धर्मामध्येच सर्वधर्मसमभाव आहे. दुसऱ्या धर्माबद्दल आदर हा हिंदुंनी केला, असं ते म्हणाले. 


ते म्हणाले की, ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्या झाडालाच दगड मारले जातात. कोण म्हणतं कोथरूडला परत या, कोण म्हणतं हिमालयातून परत या, माझ्यावर किती लोक प्रेम करतात पाहा, असं ते म्हणाले. 


त्यांनी म्हटलं की, शिवसैनिकांच्या मनात असून देखील त्यांना भाजपला मदत करता आली नाही. कारण मुंबईहून अनेक निरीक्षक आले होते.  सत्यजित कदम यांना मिळालेल्या मतांमुळे बावडेकरांनी नक्की धसका  घेतला असेल, असं ते म्हणाले. 


जयश्रीताई यांच्या निमित्ताने एक महिला आमदार झाल्या त्यांना शुभेच्छा देतो. मी मन मोठं केलं होतं.  दोन वेळा जयश्री जाधव यांच्याकडे उमेदवारी घेऊन गेलो होतो, असंही चंद्रकांत दादा म्हणाले.




संबंधित बातम्या


Satej Patil : सतेज पाटलांचा झंझावात, कोल्हापूर भाजपमुक्त! 2015 पासून एकही पराभव नाही

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय


Kolhapur North By Election Results 2022 : जयश्री जाधव कोल्हापुरातील पहिल्या महिला आमदार, सत्यजीत कदम यांचा पराभव