मुंबई: हल्ली बरेच राजकारणी सुटा-बुटात आणि गाड्यांच्या ताफ्यात दिसतात. अगदी सरपंचापासून ते नगरसेवक, आमदारांपासून ते खासदारांपर्यंत सर्वच जण व्हाईट कॉलर टाईट करुन वावरताना दिसतात.

मात्र राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मंत्री रेल्वेच्या फलाटावर बसून, काम करताना तुम्ही पाहिलाय? महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ते करुन दाखवलंय.

चंद्रकांत पाटील यांचा साधेपणा कोल्हापूरकरांना परिचीत आहेच, पण त्याची प्रचिती मुंबईतही पाहायला मिळाली.

चंद्रकांतदादा काल मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एक अधिकारी काम घेऊन आला. एका महत्त्वाच्या कागदपत्रावर चंद्रकांत पाटलांची सही हवी होती. मात्र रेल्वे प्लॅटफॉर्मवर सही कशी घ्यायची असा संभ्रम अधिकाऱ्याच्या मनात होता.

पण मोकळ्या ढाकळ्या चंद्रकांत पाटलांनी कोणताही बडेजाव न करता, प्लॅटफॉर्मवर पडलेल्या गाठोड्यावर बसून, सर्व पेपर वाचून काढले. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी तिथेच सह्या केल्याआणि ते कोल्हापूरसाठी रवाना झाले.

यावेळी आजूबाजूला अन्य प्रवासीही होते. शिवाय चंद्रकांत पाटलांचे सुरक्षा रक्षक आणि स्वीय सहाय्यकही होते. चंद्रकांत पाटलांचा हा साधेपणा पाहून सर्वच जण अवाक् झाले.

ज्याला खरंच काम करायचं आहे, त्याला वेळ - काळ- ठिकाण महत्वाचं नसतं, हेच चंद्रकांतदादांनी कृतीतून दाखवून दिलं.