मुंबई :  मराठा मोर्चावरुन मुख्यमंत्रीपदाबाबत उलट-सुलट चर्चा सुरु असताना, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं पद धोक्यात नाही. तसंच  कोणतीही चूक नसताना मुख्यमंत्री बदलण्याची संस्कृती भाजपात नाही, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटलांनी दिलं.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हतबल नाहीत, मराठा आरक्षणाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे, असंही पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य


मी किती दिवस मुख्यमंत्री पदावर असेन याची पर्वा नाही, पण जेवढे दिवस या पदावर असेन, तेवढे दिवस परिवर्तनासाठी झटत राहू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

नवी मुंबईत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एकीकडे मराठा समाजाच्या विराट मोर्चांमुळं पुणं भगवं झालं होतं, त्याचवेळी मुख्यमंत्री नवी मुंबईत अण्णासाहेब पाटलांच्या जयंतीनिमित्त भाषण करत होते. मराठा समाज, त्यांची स्थिती, आरक्षण या मुद्द्यांवर बोलता बोलता ते थेट स्वत:च्या खुर्चीवर आले, आणि किती दिवस मुख्यमंत्री राहू याची फिकीर नसल्याचं वक्तव्य केलं. आणि सरकार मजबूत असताना मुख्यमंत्र्यांना अचानक आपली खुर्ची का आठवली? याची कुजबूज सुरु झाली.

मराठा मोर्चेकरांशी चर्चा करण्यास सरकार तयार : चंद्रकांत पाटील

मराठा मोर्चाबद्दल सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला नाही तर मराठा सामाजाचा उद्रेक होऊ शकतो असा सरकारला इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे.

सरकार एक पाऊल पुढे टाकत जिल्हा पातळीवर मूक मोर्चा आयोजकांशी चर्चा करायला तयार आहे. मराठा मोर्चाची कोंडी सोडवण्यासाठी मंत्रीसमूह करण्याचा प्रस्ताव आहे. एक मंत्री आणि दोन विरोधी पक्ष नेते  एकत्र येऊन एक गट तयार होईल.  हा गट जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन मराठा मोर्चा आयोजकांशी जाऊन चर्चा करेल.  लवकरच विरोधी पक्षनेत्यांशी करणार चर्चा करु, असंही यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.