धानोरकर म्हणाले की, "दारुबंदी हा विषय चुकीचाच होता. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघामध्ये 15 हजारांच्या मतांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. इथे मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले. दारुबंदीसाठी ज्या नियम आणि अटी ठेवल्या होत्या, त्याची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु आहे. सरकारचा महसूल सुद्धा बुडालेला आहे. लोकांना तो पटणारा विषय नाही. एका जिल्हात दारुबंदी करुन काय साध्य करणार आहे. तुमच्या हातात केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आहे. पूर्ण राज्यात दारुबंदी करायला हवी."
कोण आहेत बाळू धानोरकर?
- काँग्रेसमुक्त महाराष्ट्र होण्यासाठी काँग्रेस पक्षाला ज्या एका उमेदवाराने वाचवलं ते म्हणजे सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर.
- सुरेश धानोरकर हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत.
- चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला.
- शिवसेनेला रामराम ठोकून ऐन निवडणूक काळात काँग्रेसमध्ये आलेल्या सुरेश धानोरकर हे या निकालातून काँग्रेससाठी मोठा आधार ठरले.
चंद्रपुरात चार वर्षांपासून दारुबंदी
चंद्रपूर जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी दारुबंदी झाली होती. 20 जानेवारी 2015 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दारुबंदीचा निर्णय घेतल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दारुबंदीचं आश्वासन दिलं होतं.
वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात आधीपासूनच दारुबंदी लागू आहे. मात्र चंद्रपूर हा भौगोलिकदृष्ट्या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये येतो. त्यामुळे चंद्रपुरात दारुबंदी नसल्याने वर्धा आणि गडचिरोलीतही दारुबंदीची नीट अंमलबजावणी होऊ शकत नव्हती.
चंद्रपुरात राज्यातली सर्वाधिक दारु विक्री होते, असा तज्ज्ञांचा अभ्यास आहे. त्यामुळे चंद्रपुरात दारुबंदी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी विशेष पुढाकार घेतला होता. बंग यांच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर राज्य सरकारने चंद्रपुरात दारुबंदी लागू केली.
दारुबंदी असलेला चंद्रपूर हा राज्यातील तिसरा जिल्हा ठरला. चंद्रपुरात दारुबंदी केल्याने वर्षाला सुमारे दोनशे कोटी रुपये कमी महसूल मिळत आहे.
संबंधित बातम्या