अकोल्यात रक्तरंजित संघर्ष, राजकीय वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2019 01:05 PM (IST)
अकोल्यात लोकसभा निवडणुकीनंतर रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला आहे.
अकोला : अकोला जिल्ह्यातील मोहाळा गावात काँग्रेस आणि भाजपच्या गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मतीन पटेल नामक भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. मतीन हा भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत अकोला लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हे सर्व दहा आरोपी हत्याकांडानंतर फरार आहेत. मोहाळा हे हिदायत पटेल यांचं गाव आहे. दरम्यान या घटनेत मुमताज पटेल नामक आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अकोल्यात लोकसभा निवडणुकीनंतर रक्तरंजित संघर्ष झाला आहे. निवडणूकीच्या वादातून मोहाळा गावातील काँग्रेस आणि भाजपच्या गटांत काल शुक्रवारपासून धुसफुस सुरू होती. आज शनिवारी लहान मुलांच्या भांडणावरुन हा वाद उफाळून आला. मोहाळा हे गाव अकोला लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचं गाव आहे. त्यांच्याच गटाचा भाजप कार्यकर्त्यांशी वाद झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर मोहाळा गावात तणावपूर्ण शांतता आहे. गावात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात अकोला लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व दहा आरोपी फरार आहेत.