बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगड विधानसभा मतदारसंघातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश पाटील यांनी काल (27 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या विधीमंडळात आमदारकीची शपथ घेतली. आमदार राजेश पाटील यांनी सीमाभागातील नागरिकांचे स्मरण करुन शपथ घेतली होती. शपथ पूर्ण झाल्यानंतर पाटील यांनी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे अशी मागणी केली. त्यानंतर जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सीमाबांधव! अशा घोषणा दिल्या. हे पाहून बेळगावमधील कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे.


राजेश पाटील यांनी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे अशी घोषणा दिल्यामुळे या भागात राहणाऱ्या मराठी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमाबांधव राजेश पाटील यांचं कौतुक करत आहेत. परंतु हे पाहून कन्नड संघटनांना पोटशूळ उठला आहे. बेळगावातल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी आज (28 नोव्हेंबर) आमदार राजेश पाटील यांचा फोटो जाळून त्यांचा पोटशूळ शमवून घेण्याचा प्रयत्न केला.

कन्नड संघटनांकडे मराठी-कन्नड वाद सोडून दुसरे कोणतेही विषय नाहीत. त्यामुळे हे लोक सीमाप्रश्न, मराठी भाषा, मराठी संस्कृतीविरोधात कोणत्याही गोष्टीचे भांडवल करुन आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामाध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आज या लोकांनी सेंट झेव्हियर्स शाळेसमोर आमदार राजेश पाटील यांची प्रतिमा दहन करुन पाटील यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आहे.

या कन्नड संघटनेतील लोकांचे म्हणणे आहे की, बेळगावात मराठी आणि कन्नड लोक सामंजस्याने राहतात. परंतु राजेश पाटील यांनी हे वातावरण बिघडवण्याचे काम केले आहे.

राजेश पाटील यांचा शपथविधी पाहा