Chalisgaon Flood : जळगावातील चाळीसगावात मुसळधार पावसामुळं पूरस्थिथी निर्माण झाली होती. चाळीसगाव तालुक्यातील 750 हून अधिक गावांमध्ये पाणी शिरलं होतं. तर आतापर्यंत तीन जणांचा पुरात मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच अद्याप कोणती बेपत्ता असल्याची तक्रार मिळालेली नसल्याची माहितीही प्रशासनाकडून दिली गेली आहे. तसेच औरंगाबादच्या कन्नड घाटात आणि डोंगरी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस काल झाला. त्यामुळे घाटात जवळपास 7 ते 8 ठिकाणी दरड कोसळली होती. त्यामुळे मंगळवारी पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. अद्यापही औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. ही दरड आणि हा राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे. 


जळगावच्या तळेगावात 145 मिमि, तर चाळीसगावात 90 मिमि पावसाची नोंद करण्यात आली. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. सध्या पुराचं पाणी ओसरलं असून अनेक गावांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. चाळीसगावात दूध उत्पादक पट्ट्यात तडाखा बसल्यानं 500 हुन अधिक गुरं वाहून गेल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली. पंचनामे आणि तातडीची मदत यासाठी गतीनं सूत्रं हलवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 




प्रत्येक गावात वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, शाखा अभियंता आणि विस्तार/मंडळ अधिकारी, अशी पथकं नेमून वैद्यकीय तपासणी, पाणीपुरवठा दुरुस्ती आणि शुद्धीकरण, मृत पशूंची शास्त्रीय विल्हेवाट, नुकसान पंचनामे तात्काळ सुरु करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी दर्जाचे विशेष अधिकारी नियुक्त करत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्वच्छतेसाठी पंचायत समिती आणि नागरपालिकेकडून नियोजन केलं जात असून तात्पुरत्या निवाऱ्यातील नागरीकांसाठी मूलभूत सुविधांचं नियोजन केलं जात आहे. प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडून जीवनावश्यक किटचे वाटप सुरु असून समाजसेवी संस्थांची भरघोस मदत मिळत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक स्वतः सकाळपासून घटनास्थळी हजर असून गावांना भेटी देत आहेत. 




चाळीसगाव - कन्नडला जोडणाऱ्या चाळीसगाव शहरातील जूना पूल महापुरात पाण्याखाली गेला होता. मात्र पाणी ओसरताच या पुलावरील अनेक कठडे, विद्युत खांब यासोबतच विशेष म्हणजे, पुलावरील रस्त्याचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच समोर आलं आहे. नदीकिनारी छोटे व्यवसाय करत पोट भरणाऱ्या अनेकांच्या टपऱ्याही पाण्यात बुडाल्या आहेत. पुरामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. 


दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराचं पाणी पंधरा गावात शिरल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यातील अनेक गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागला. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. तर मोठ्या प्रमाणावर जिवीतहानीही झाली आहे.