सुकाणू समितीचं राज्यभर चक्काजाम आंदोलन
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2017 05:05 PM (IST)
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुकाणू समितीनं चक्का जाम आंदोलन केलं आहे.
मुंबई : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुकाणू समितीनं चक्का जाम आंदोलन केलं आहे. संपाची हाक देऊन इतिहास रचणाऱ्या पुणतांब्यातही रस्ता रोको करण्यात आला. पालघर पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, सिल्वासा, नाशिक रस्त्यावर आदिवासी नृत्य करत शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. वर्धा सरकारनं कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही वर्ध्यात आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. नाशिक सुकाणू समितीच्या रास्ता रोको व श्रावणी सोमवार यामुळे नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळाली. सुट्टीमुळे त्र्यंबकेश्वरमधे येणाऱ्या देशभरातल्या भाविकांना या चक्का जामचा फटका बसला. एक तासापेक्षा अधिक काळ रस्ता रोको झाल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा दिसून आल्या. नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आणि शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरले.