सातारा: महाराष्ट्राचं काश्मीर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे. महाबळेश्वरमधे गारांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.


वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. त्यामुळं गेल्या काही काळात वाढलेलं तापमान अचानक कमी झालंय.



हवेत सध्या अल्हाददायक गारवा निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. त्यामुळं मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाबळेश्वर गारेगार झाल्याचं चित्र आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल

पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या देशवासियांसाठी आनंदाची बातमी आहे. भारताच्या प्रवेशद्वारातून मान्सूनने आगमन केलं आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर मान्सून दाखल झाला आहे.

रायगडमध्येही मान्सूनपूर्व सरी

दरम्यान केरळात आज मान्सून दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यात. रायगडच्या पनवेल, उरण परिसरातही रिमझिम पावसानं हजेरी लावली. तर दिवेआगारमध्ये सकाळी पाऊस झाला. त्याचप्रमाणं अलिबाग, रोहा आणि पेणमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं.

अंबरनाथमध्ये मान्सूनपूर्वच्या सरी बरसल्या, त्यामुळं कामासाठी बाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ झाली.

तर तिकडं तळकोकणातही वरुणराजा मुसळधार बरसतोय. सिंधुदुर्गात मान्सूनपूर्वच्या जोरदार सरींनी झोडपून काढलं आहे.