सांगली : सांगली जिल्ह्यात सध्या पाणी फाऊंडेशनचे काम  जोरात सुरु आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावर्डे गावात पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात अभिनेता आमिर खानने हजेरी लावली.


यावेळी अमीर खानची पत्नी किरण राव देखील उपस्थित होती. यावेळी अमीर खानने गावातील नागरिकांशी संवाद साधत पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानाच्या माध्यमातून गावात चालू असलेल्या कामाचे कौतुक केले.

प्रत्येक गाव एक झाल्यास सर्वच समस्या सुटतील, असे मत आमिरने व्यक्त केले. यावेळी त्याला पाहण्यासाठी तालुक्यातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

राणादासह 'तुझ्यात जीव रंगला'ची संपूर्ण टीम दुष्काळी भागात श्रमदान करणार  
दुसरीकडे तुझ्यात जीव रंगला मधील राणा म्हणजेच हार्दिक जोशी दुष्काळी भागात श्रमदान करणार आहे. आपल्या संपूर्ण टीमसोबत राणादा पाणी फाऊंडेशनला मदत करणार आहे. सांगलीत त्याने ही माहिती दिली. राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाणी  फाऊंडेशनकडून जे काम सुरु आहे.  यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन राणादा अर्थात हार्दिक जोशी याने केले.

याचबरोबर 'तुझ्यात जीव रंगला'ची संपूर्ण टीम सांगलीच्या दुष्काळी भागात श्रमदानाला येणार असून त्याचे नियोजन सुरु असल्याचेही राणादाने सांगितले.

शेतकरी आमच्या देशाचा पिलर आहे त्यामुळे पिलर ढासळला तर देश पडून जाईल. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटाचा सामना करावा, लढा द्यावा असे आवाहनही हार्दिक जोशीने शेतकऱ्यांना केले आहे.