Christmas Celebration in Maharashtra: ख्रिसमस हा सण जगभरात आज मोठ्या उत्साहात साजरी होतोय. देशात आणि राज्यातही ख्रिसमसचा मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. ख्रिसमस आणि लाँग विकेंडनिमित्त साधून राज्यातील नागरिक विविध पर्यटनस्थळावर गर्दी करताना दिसत आहेत. राज्यात कुठे आणि कशा प्रकारे नागरिक ख्रिसमस साजरा करत आहेत, हे जाणून घेऊ...


Pune Christmas Celebration: पुण्यात शिक्षक झाले संताक्लॉज 


पुण्यात सर्वत्र ख्रिसमसचा उत्सव पाहायला मिळत आहे. ख्रिसमस निमित्त पुण्यातील खाजगी शाळेचा अभिनव उपक्रम राबवला आहे. येथे शिक्षक-शिक्षिका संताक्लॉज बनून विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेकडून भेट वस्तू ही देण्यात आल्या. आपले शिक्षक-शिक्षिका घरी आलेले पाहून बाच्चे कंपनी सुद्धा खुश झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शाळेच्या या नावीन्य पूर्ण उपक्रमाचे पालक वर्गातून कौतुक करण्यात आलं आहे.


Shirdi Sai Baba Temple Nashik: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भक्तांची गर्दी 


आज साईबाबांच्या शिर्डीतही भाविकांनी मोठी गर्दी केली असून ख्रिसमसचा उत्साह शिर्डीतही बघायला मिळतोय.  नाताळ आणी रविवारच्या सुट्टीमुळे साईनगरी भक्तांच्या गर्दीने हाऊसफुल झाली आहे. सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने दर्शनरांगा फुलून गेल्या असून साईमंदिरही आकर्षक फुलांनी आणी विद्यूत रोषणाईने सजविण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियम पाळण्याचं आवाहन साईबाबा संस्थानने भाविकांना केले आहे.


Tadoba National Park: ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुललं 



ख्रिसमस आणि न्यूयेअर मुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलाय. पर्यटकांच्या गर्दी मुळे व्याघ्र प्रकल्पातील 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर फुल झालीच आहे. पण स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध असलेले ताडोबातील 4 कॅन्टर, मिनीबस, VIP कोट्यातील गाड्या आणि बफर क्षेत्रातल्या सर्व जिप्सी पण हाउसफुल झाले आहेत. मुख्य म्हणजे या वर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी टायगर सफारी साठी ताडोबात दाखल झाले आहेत. त्यामुळे ख्रिसमस आणि न्यूयेअरच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे ताडोबात चैतन्य निर्माण झालं आहे.


Nanded : नाताळ निमित्त प्रभू येशू ख्रिस्तांच्या भक्तीत भाविक तल्लीन


आज नांदेड शहरातील पोलिस मुख्यालय भागातील मेथोड चर्चमध्ये आज सकाळी नऊ वाजता प्रभू येशूला प्रार्थना करत हा ख्रिसमस सण उत्सव साजरा करण्यात आलाय. यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमून या सणाला सुरुवात झालीय. आज दिवसभर प्रभू येशूच्या प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.