Maharashtra News : अयोध्येमध्ये (Ayodhya) भव्य राम मंदिराचं (Ram Mandir) निर्माणकार्य जोरात सुरु आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाची (Ram Temple) प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी (Diwali) साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.


22 जानेवारीला दिवाळी साजरी करा


22 जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे. मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी, मंदिर आणि महत्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मुंबईतील 10 ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्त्वात सुरू होत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रमात मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते, या कार्यक्रमात त्यांनी या सूचना दिल्या आहेत.


मुख्यमंत्र्यांच्या सूचना


यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, ''मुंबईला स्वच्छ करताना प्रदूषण रोखण्यासाठी देखील काम करायचं आहे. मोठ्या प्रमाणात झाड लावली पाहिजेत. ज्या ठिकाणी काम सुरू असल्याने झाड कापली जातात. त्याबदल्यात इतर ठिकाणी झाड लावली गेली. शिवडी न्हावा शेला हा प्रकल्प करताना एकही फ्लेमिंग आपल्या डून जाणार नाही, याची काळजी आम्ही घेतली, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.


मुंबईत 10 ठिकाणी महा स्वच्छता अभियान सुरु असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित ठिकाणी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थितांशी संवाद साधून महास्वच्छता अभियानाबद्दल मार्गदर्शन केले.


'या' 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान सुरु :



  1. भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया

  2. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा पूर्व

  3. सदाकांत धवन मैदान, भोईवाडा पोलिस स्थानकासमोर, नायगाव पूर्व

  4. वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम

  5. वेसावे (वर्सोवा) चौपाटी

  6. गणेश घाट, बांगूर नगर लिंक रोड, गोरेगाव पूर्व

  7. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रीडांगण, शिवसृष्टी, नेहरू नगर, कुर्ला पूर्व

  8. अमरनाथ पाटील उद्यान, गोवंडी पूर्व

  9. डी मार्ट जंक्शन, हिरानंदानी संकूल, पवई

  10. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व)


1300 टन डेब्रीज आणि 183 टन कचरा गोळा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'संपूर्ण स्वच्छता मोहीम' सुरू केली. 3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला. मुंबई महानगरात सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत 1 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत चार स्वच्छता अभियानातून 1300 टन राडारोडा (डेब्रीज) आणि 183 टन कचरा गोळा करण्यात आला. तर, सुमारे 22 हजार 277 किलोमीटर इतक्या अंतराचे रस्ते धुऊन काढण्यात आले आहेत.  संपूर्ण स्वच्छतेसाठी तब्बल 5 हजार 245 इतके मनुष्यबळ एकाचवेळी विविध ठिकाणी कार्यरत आहेत. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा गोळा करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी तब्बल 508 वाहने आणि फायरेक्स मशील, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणाही दिमतीला आहेत.