मुंबई : देशात आणि खासकरुन महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळे निर्बंध घातले गेले आहेत. अशात राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेतला आहे. मात्र राज्यातील लाखो विद्यार्थी देणार असलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचं काय होणार? याकडे लक्ष लागून आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आधी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा पास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र  दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाईन घेण्यावर सरकार अद्याप तरी ठाम आहे.


सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांवर प्रियांका गांधी यांची ट्वीटरवर टीका
कोरोनाचं संक्रमण वाढत चालल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द कराव्यात किंवा ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी ट्वीटरवर टीका केली आहे.  कोरोना वाढत असताना मुलांना परिक्षा केंद्रावर यायला सांगून परीक्षा द्यायला सांगणं चुकीचं आहे. एक तर परीक्षा रद्द केल्या पाहिजेत किंवा ऑनलाईन केल्या पाहिजेत किंवा पुढे ढकलल्या पाहिजेत, असं त्यांचं मत आहे. सीबीएसईवर प्रियांका गांधीचा आक्षेप आहे तर राज्यात काँग्रेसच्या नेत्या असलेल्या वर्षा गायकवाड शिक्षणमंत्री आहेत. त्या आता एसएससी एचएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.  


नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार, शिक्षण विभागाचा निर्णय


शिक्षणमंत्री करत आहेत आमदारांशी चर्चा 
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या दहावी आणि बारावी परीक्षांबाबत राज्यातील आमदारांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. आमदारांशी चर्चा करुन त्या त्यांच्याकडून मतं जाणून घेत आहेत. सोबतच गायकवाड या राज्यातील पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करत असल्याची देखील माहिती आहे. 


जूनमध्ये ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन परीक्षा घ्यावी- रोहित पवार
दहावी आणि बारावीची परीक्षा जूनमध्ये ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन घ्यावी अशी भूमिका राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे. रोहित पवारांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेण्यापूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या पालक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, तज्ज्ञ मंडळी या सगळ्या घटकांशी चर्चा करतायेत,हे नक्कीच प्रशंसनीय आहे.  ऑनलाईन परीक्षा म्हणजे घरी बसून नाही तर त्यासाठीही परीक्षा केंद्रावर जाव लागणार आहे. त्यामुळं जूनमध्ये का होईना ऑनलाईनऐवजी नेहमीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेणंच योग्य होईल. यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जाणार नाही आणि भविष्यात त्यांना अडचणही येणार नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.  मुलांची शाळा हेच त्यांचं परीक्षा केंद्र असेल त्यामुळं त्यांना दुसऱ्या केंद्रावर जावं लागणार नाही. दरम्यान,परीक्षेपूर्वी या प्रक्रियेतील सर्वांचं लसीकरण करावं व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही केंद्र सरकारशी चर्चा करावी.निकाल वेळेवर लावण्यासाठीही आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले. 


मोठी बातमी : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा पुढे ढकलाव्यात - आमदार आशिष शेलार


राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता दहावी, बारावीची परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. कोविडची परिस्थिती आटोक्यात येताच योग्य वेळी दोन्ही पद्धतीने परिक्षा घ्याव्यात असे मत भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज मांडले.राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या परिक्षांबाबत काय करावे? याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आशिष शेलार यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली.यावेळी आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडतांना सांगितले की,  कोविडची सध्याची भयावह स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्याची प्रथम काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच या सोबतच सरकारने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्याची सुध्दा काळजी करणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्य स्थितीमध्ये परिक्षांच्या नियोजित तारखा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच पुन्हा आढावा बैठक घेऊन योग्य वेळी परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने घ्याव्यात.  आता शासनाने अधिक विलंब न करता निर्णय तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल, असेही आशिष शेलार यांनी मंत्र्यांना सूचित केले.