मुंबई : महाराष्ट्रातल्या चार महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाताचा कट दहशतवादविरोधी पक्षाने उधळून लावला आहे. आज नालासोपाऱ्यात हिंदू जनजागृतीच्या तीन सदस्यांच्या अटकेच्या कारवाईनंतर एटीएसने ही माहिती कोर्टात दिली आहे. पुणे, सोलापूर, सातारा आणि नालासोपाऱ्यात घातपात घडवण्याचा या तिघांचा डाव असल्याचा दावा एटीएसने केला आहे.
गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यात एटीएसनं कारवाई करत भांडार आळीतल्या घरातून तब्बल 20 देशी बॉम्ब आणि 50 बॉम्ब बनवण्याचं सामान हस्तगत केलं. शिवाय त्याच घरातून वैभव राऊत याला अटक केली. वैभवच्या चौकशीनंतर शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना एटीएसनं अटक केली. आज कोर्टात आरोपींना हजर केल्यानंतर महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा डाव असल्याचं समोर आलं.
मुंबई सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती समीर अडकर यांच्या विशेष न्यायालयात वैभव राऊतसह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना हजर करण्यात आले. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एटीएसने कोर्टात काय माहिती दिली?
- नालासोपाऱ्यात केलेल्या कारवाईत 20 गावठी बॉम्ब, 2 जिलेटिनच्या कांड्या हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
- शरद कळसकरकडे बॉम्ब कसा बनवायचा? याचा नोट सापडली, तर वैभव राऊतकडून 22 गोष्टी हस्तगत केल्या आहेत. शिवाय, सुधन्वा गोंधळेकर हा दोघांशी फोनवर संपर्कात होता.
- बॉम्बचा वापर कुठे होणार होता?, कसा होणार होता? हे कुठल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत का? याचा तपास करायचा आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
कुणाचा कुणाशी संबंध?
धक्कादायक म्हणजे, सुधन्वा गोंधळेकर हा शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याचे सनातन प्रभात वृत्तपत्रातील एका वृत्तावरुन समोर आले आहे. शिवप्रतिष्ठान संघटना ही संभाजी भिडे यांची आहे. तर शरद कळसकर आणि वैभव राऊत हे दोघे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त आहेत.
वैभव राऊतकडे काय काय सापडलं?
12 देशी बॉम्ब
2 जिलेटीन कांड्या
4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर
22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर
सेफ्टी फ्यूज वायर
1500 ग्राम पांढरी पावडर
विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या
6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्स
बॅटरी कनेक्टर
कन्व्हरसह अन्य साहित्य
प्रकरण काय आहे?
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. महत्त्वाचं म्हणजे वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी सनातन संस्थेशी संलग्न आहे. एटीएसने गुरुवारी रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात.
सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या वैभव राऊतच्या घरी इतकी मोठी स्फोटकं कशासाठी एकत्र केली होती, याचा तपास आता एटीएस करत आहे.
एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून एटीएसने सापळा रचला होता. गुरुवारी रात्री खात्री करुन वैभव राऊतच्या घरी धाड टाकली असता, एटीएसला स्फोटकांचा साठा आढळला. पोलिसांनी वैभवाला ताब्यात घेऊन अधिक चौकशी सुरु केली आहे.
एटीएसने या कारवाईनंतर डॉग स्कॉड, फॉरेन्सिक टीम यांनाही बोलावून तपासणीही केली. गुरुवारी रात्रभर एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभव राऊतच्या घरी सर्च ओपॅरेशन केलं. मिळालेले बॉम्ब, त्यासाठी लागणारी सामुग्री ही कुठून आणली, हे बॉम्ब कशासाठी बनविले जात होते, याचा सर्व तपास आता सुरु आहे.
सनातनची प्रतिक्रिया
वैभव राऊत हा सनातनचा साधक नाही, पण तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता, त्याच्या घरी स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, गृहमंत्री वारंवार सनातन संस्थेला बदनाम करत आहेत. वैभवला शक्य ती सर्व मदत करु, अशी प्रतिक्रिया सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांनी एबीपी माझाला दिली.
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातही पोलिसांनी अनेक हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना पकडलं होतं, त्याचा निकाल काय लागला? दहा वर्ष आम्ही खटला चालवला, पोलिसांची भूमिका संशयित होती हे सिद्ध झालं. वैभव राऊतही चांगला माणूस आहे. त्याच्या घरी असं काही सापडणं शक्य नाही. वैभव राऊतला कोणी पकडलंय, त्याला कुठे ठेवलंय याची माहिती नाही. हा पोलिसांचा कट वाटत आहे. वैभव राऊतकडे असं काही सापडणं शक्य नाही. माझा महाराष्ट्र पोलिसांवर, एटीएसवर विश्वास नाही. सकाळी 11 वा. आम्ही कोर्टात जाऊन माहिती घेऊ. वैभव राऊत आणि त्याच्या कुटुंबाला जी मदत लागेल ती करु. मालेगाव बॉम्बस्फोटात काय झालं हे आम्ही पाहिलंय, स्फोटकं पकडलेला कार्यकर्ता निर्दोष निघाला, पोलिस काय करतात हे माहित आहे, असं संजीव पुनाळेकर यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
'सनातन' साधकाच्या घरी स्फोटकांचा साठा, नालासोपाऱ्यात ATS ची धाड
स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराष्ट्रातल्या घातपाताचा कट एटीएसने उधळला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Aug 2018 07:16 PM (IST)
मुंबई सत्र न्यायालयातील न्यायमूर्ती समीर अडकर यांच्या विशेष न्यायालयात वैभव राऊतसह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना हजर करण्यात आले. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -