मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर  सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हणा यांच्याविरोधात तक्रार केली होती. दरम्यान, यावरून विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज आणि भाजपवर टीका केलीय. "मोहित कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. तो आता आमच्या विरोधात आरोप करणार का? मोहित कंबोज याला कोणी अधिकार दिले? कोण आहे तो? असे प्रश्न विद्या चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.

  
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोहित कंबोज यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. अमित शाहांचं जन्मस्थान आणि भाषेवरून विद्या चव्हाण यांनी टीका केली होती. मोहित कंबोज यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वीच विद्या चव्हाण यांना जय श्रीराम असं ट्विट केलं होतं. परंतु, यातून पूर्ण अर्थ स्पष्ट होत नव्हता. परंतु, आज गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील कंबोज यांनी दुसरे ट्विट करून जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली असे म्हणत विद्या चव्हाण यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची कॉपी ट्विट केली आहे.  






याबाबत बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या, "मोहित कंबोज हे अभ्यास करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. निवडणुकीवेळी मालाड येथे पैशाने भरलेल्या गाडीसह मोहित कंबोज सापडला होता. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सोडून दिले. त्यावेळी फडवीस यांच्याकडं गृहखातं होतं. कंबोज यांचा नातेवाईक ड्रग्ज पेडलर असून नवाब मलिक यांनी त्याचा भांडाफोड केल्यानंतर मलिक यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. मोहित कंबोज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. परंतु, तो आता आमच्या विरोधात आरोप करणार का? मोहित कंबोज याला कोणी अधिकार दिले? तो कोण आहे?