Pune Ganeshotsav 2022: राज्यभरात यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुणे पोलिसांकडून देखील जय्यत तयारी सुरु आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि नियोजन सांगितले आहे. पुणे पोलिस आगामी गणेशोत्सवासाठी सज्ज आहे, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. 


3600 सार्वजनिक मंडळ पुण्यात आहेत. गणपती पाहण्यासाठी अनेक नागरीक पुण्यात दाखल होतात. प्रत्येक गणपतीजवळ मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने गर्दीचे नियोजन तसेच ट्रॅफिकचे नियोजन देखील केलेले आहे. 7500 हजार पोलिस रस्त्यावर गणेशोत्सवात सज्ज आहेत. मंडळाकडून वाहतूक अडथळा होत असेल तर त्यांना देखील सूचना दिल्या आहेत, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.


कोणत्याही मंडळाने जर डिजेच्या आवाजाचे उल्लंघन झालं तर कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे मंडळापुढे मिरवणुकी दरम्यान किती ढोल पथक लावण्यासाठी कोणतंही बंधन नसणार आहे.  देखाव्यासाठी भाविकांना दर्शनासाठी कुठली ही अडचण येणार नाही अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. बाहेरून चोरी कारणासाठी येणाऱ्या टोळीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना सोयीसाठी पुणे पोलिस ट्विटर हॅण्डल वर सगळ्या अपडेट मिळतील,  असं त्यांनी सांगितलं आहे.



विसर्जनाचं नियोजन
विसर्जनाचे घाट जिथे मंडळ येत असतात तिथे आता मेट्रो चे खांब आहेत. त्यामुळे यंदा गणेश मंडळांच्या देखाव्याची
उंची 20 फूट असावी. त्याचबरोबर विसर्जन मिरवणुकीला 18 फूट देखावे असावे. कोथरूडकडून येणारे मंडळ जे आहेत त्यांनी उंची 16 फूट असावी, असं झोन वनच्या पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी स्पष्ट केलं आहे.


वाहतूक कशी असेल?
वाहतुकीसाठी काही रोड बंद केले जातील. या बाबतीत सविस्तर नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. पी एम पी एल बसेस साठी देखील पर्यायी मार्ग दिलेले आहेत.  अथर्व पठण साठी येणाऱ्या महिलांना वाहतुकीची अडचण होणार नाही याची दखल घेण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितलं आहे.


पोलिांची करडी नजर
पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या 10 दिवसात अनेक प्रकारचे गुन्हे समोर येतात. यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात होणार असल्याने नागरीकांची गर्दीदेखील मोठ्या प्रमाणात असेल. त्यासाठी पोलिसांनी मागील काही दिवसांपासूनच शहरात विशेष बंदोबस्त ठेवला आहे. यात नागरीकांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्यासोबतच शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून गुन्हे रोखण्याला मदत होणार आहे.