पुणे : वादग्रस्त वक्तव्य करणारे  शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide)  यांच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोध असतानाही आणि परवानगीशिवाय रॅली आयोजित केल्यामुळे त्यांच्यासह 150 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांचादेखील समावेश आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील मांजरी कोळवाडी परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संघटितांनी स्थानिक पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला होता, पण परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी परवानगी नाकारली असतानाही रॅली काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी स्वत: कारवाई करत लोणी कंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


विविध संघटनांकडून विरोध


शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दाखला देत अनेक संघटनांनी कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. पुण्यात घटना घडू देऊ नका, अशी विनंती करण्यासाठी अनेक संघटनांनी शहरात आंदोलनही केले होते. या कार्यक्रमापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हा कार्यक्रम घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचा या कार्यक्रमाला तीव्र विरोध होता. संभाजी भिडे यांनी यापूर्वी महापुरुषांच्या बाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य तसेच भीमा कोरेगाव 2018 सालची दंगल यामध्ये मुख्य आरोपी म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तसेच संभाजी ब्रिगेड, OBC Welfare Foundation, भीम आर्मी, समता परिषद, मास मूव्हमेंट,  आनंदी प्रतिष्ठान, यंग पृथ्वी फाऊंडेशन आणि इतर समविचारी संघटनांचा या होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध केला होता.


संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ; तुषार गांधींकडून डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


काहीच दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या विरोधात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी (Tushar Gandhi) आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात तक्रार दाखल केली होती. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, अन्वर राजन हे त्यांच्यासोबत होते. गांधी घराण्यातील स्त्रियांचा अपमान आणि बेआब्रू केली आहे. ही गांधी घराण्यातील सगळ्याच पिढ्यांची बेआब्रू आहे. त्यामुळे बेआब्रू करणे, महिलांचा अपमान करणे, लोकांच्या मनात अनेक गोष्टींबाबत भेदभाव निर्माण करणे, गुन्हेगारी स्वरुपाचा वक्तव्य करणे आणि संगनमताने अशाप्रकारे कृत्य करणे त्यासोबतच समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य या सगळ्या कलमांअंर्तगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तक्रार नोंदवण्यात आली आहे, असं सरकारी वकील असिम सरोदे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर म्हटलं होतं.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Bacchu Kadu : ...नाहीतर पुन्हा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही; बच्चू कडू थेटच म्हणाले