सांगली : अनिकेत कोथळे खून प्रकरणाने चर्चेत आलेल्या सांगली पोलिसांवर पुन्हा एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. मिरजेतील पोलीस हवालदारावर दाम्पताच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. साईनाथ ठाकूर असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव असून तो मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

एका दाम्पत्याला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या खासगी महिला सावकाराला मदत केल्याचा ठपका या हवालदारावर ठेवण्यात आला आहे. मिरजेतील सुंदरनगर भागातील अभिजित विजय पाटील आणि कल्याणी पाटील या दाम्पत्याने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती.

मेडिकल चालवणाऱ्या अभिजित पाटील यांनी व्यवसायासाठी जयसिंगपुरातील मांत्रिक लक्ष्मी निवास तिवारी यांच्या मध्यस्थीने पंडित नाईक आणि मिरजेतील बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराकडून सुमारे 32 लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. सावकारांचं हे कर्ज फेडण्यासाठी त्याला स्वत:च्या मालकीचा बंगला विकून भाड्याचं घर घ्यावं लागलं होतं.

सावकारांनी कर्ज परतफेडीसाठी धमक्या देण्यास सुरुवात केल्याने पाटील कुटुंबीय अस्वस्थ होतं. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून 25 ऑगस्ट 2017 रोजी अभिजित याची पत्नी कल्याणी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. हे प्रकरण मिरजेतील काही नेते मंडळींच्या मध्यस्थीने मिटवण्यात आलं.

मात्र, इचलकरंजीतील पंडित नामक सावकार कर्ज वसुलीसाठी पुन्हा धमक्या देऊ लागल्याने अभिजित पाटील याने पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी आणि कर्जाची रक्कम व्याजासह परत देण्यासाठी इचलकरंजीतील सावकाराने आणि मिरजेतील बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे 30 ऑक्टोबर 2017 रोजी अभिजित पाटील यांनीही झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली.

दोन महिन्यांच्या काळातच तरुण दाम्पत्याच्या झालेल्या आत्महत्येप्रकरणी गांधी चौक पोलिसात लक्ष्मी निवास तिवारी, पंडित नाईक, बेबी मोहन अंडीकाठ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेबी मोहन अंडीकाठ या महिला सावकाराला मदत केल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्याने हवालदार साईनाथ ठाकूर याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. आता एका दाम्पताच्या आत्महत्येप्रकरणी पोलिस हवालदार आरोपी झाल्याने सांगली पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.