पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. खासदारांचे सख्खे बंधू सागर कोल्हे यांनी माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर अर्वाच्य भाषेत टिपणी केली आहे. फेसबुकवर पोस्ट केलेल्या या टिपणी प्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे. मंचरमधील स्थानीय नेते दत्ता गांजळेंनी तशी तक्रार दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकासआघाडीच्या सत्तेत असले तरी शिरूर लोकसभेत मात्र आघाडीचा धर्म वेळोवेळी पायदळी तुडवला जातोय, या प्रकरणाने ते पुन्हा एकदा अधोरेखित केलं.


शिरूर लोकसभा हद्दीतून जाणारा पुणे-नाशिक मार्ग आणि त्याअनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न, हा या मतदारसंघातील एक ज्वलंत मुद्दा आहे. ते प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने आणि त्याच्या श्रेयवादावरून आजी-माजी खासदारांमध्ये नेहमीच कलगीतुरा रंगतो. अशातच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळाली. अद्याप ही मंजुरी कागदापुरती मर्यादित असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात व्हायला आणखी बराच काळ लोटणार आहे. हे उघड असतानाच विद्यमान खासदार कोल्हे आणि माजी खासदार आढळराव यांच्यात श्रेयाचं राजकारण रंगलं. आता राजकारणी आहेत म्हटल्यावर ते अपेक्षित ही आहे, पण यात खासदार कोल्हे यांचे बंधू सागरने उडी घेतली अन प्रकरणाला वेगळे वळण लागले. सागरने अतिउत्साहीपणात फेसबुक पोस्ट केली, यात आढळरावांबद्दल अर्वाच्य भाषेत टिपणी केली. आढळरावांचं ज्येष्ठत्व विसरून सागरने दाखवलेल्या आततायीपणावर समाजमाध्यमातून नाराजीचा सूर पहायला मिळाला. यामुळे संतापलेल्या आढळरावांच्या समर्थकांनी मंचर पोलीस स्टेशन गाठलं. स्थानिक नेते दत्ता गांजळेंनी तक्रार दाखल केली, त्यानुसार अर्वाच्य भाषा आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे सागर कोल्हे यांना हे प्रकरण आता भोवताना दिसतंय.


विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आधी कुटुंबातील सदस्यांना संस्कृती शिकवावी मग राजकारण करावं. माझे बंधू ही राजकारणात सक्रिय होते, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांचे माझ्या विरोधकांशी मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यांनी कधीच पातळी ओलांडली नव्हती. पण खासदारांच्या बंधूने आज पातळी ओलांडून असंस्कृतपणाचं दर्शन घडवलं, हे खूप लाजिरवाणे आणि चुकीचे आहे. अशी टिपणी म्हणजे जनतेला यांनी गृहीत धरत, प्रसिद्धीसाठी कुछ भी करणं, हे चुकीचं आहे. राजकारणात अशा गोष्टींना आवर घालायला हवा. असा सल्ला आढळरावांनी कोल्हे कुटुंबियांना दिला.


SRA Housing Project : एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येणार!


माझे बंधू सागर कोल्हे यांनी चुकीची भाषा वापरली, याबाबत मी स्वतः माजी खासदार आढळराव पाटील यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तीन वेळा खासदार राहिलेल्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल अशी भाषा योग्य नसल्याचं मी जाणतो. म्हणूनच फेसबुकवरील त्या पोस्ट ही डिलीट करण्याच्या सूचना मी तातडीनं दिल्या आहेत. राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे याच मताचा मी आहे आणि त्यानुसारच मी आत्तापर्यंत वागत आलेलो आहे. असं खासदार अमोल कोल्हे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं.  




पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या मंजुरीवरूनच केवळ घमासान रंगलंय असं नाहीतर हे आजी-माजी खासदार एकमेकांबद्दल बोलले नाहीत असा एखादाच कार्यक्रम पार पडत असेल. त्यामुळे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकासआघाडीतील सत्तेचे भागीदार असले आणि एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत असले तरी शिरूर लोकसभेत मात्र हा आघाडीचा धर्म कायमच पायदळी तुडवला जातो. हे वेळोवेळी अधोरेखित झालंय. म्हणूनच पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत ही महाविकासआघाडी टिकलीच तर शिरूरमध्ये काय चित्र असेल हे नव्याने सांगायची गरज नक्कीच भासणार नाही.