चंद्रपूर : चंद्रपूरच्या माजी नगरसेविकेच्या मुलाने चारचाकी वाहन चोरले आहे. उत्कर्ष नागोसे असे चोरट्याचे नाव असून, तो माजी नगरसेविका सुषमा नागोसे यांचा मुलगा आहे. धक्कादायक म्हणजे, ज्यावेळी कार मालकाने या गोष्टीचा जाब विचारला, त्यावेळी उत्कर्षने त्यांना मारहाण करुन, त्यांची कार पेटवून दिली.
नेमकं काय घडलं?
सोमवारी रात्री उत्कर्ष नागोसे याने मित्राच्या मदतीने बाबूपेठ परिसरातील चारचाकी वाहन चोरलं. दीपक टवलाकर नामक व्यक्तीच्या घरासमोर ठेवली होती. वाहन चोरीला गेल्याचे लक्षात येताच, दीपक टवलाकर यांनी परिसरात शोधाशोध सुरु केली.
जुनोना मार्गावर उत्कर्ष आणि त्याचा मित्र चोरीच्या वाहनात बसलेले आढळून आले. टवलाकर याने जुनोना मार्ग गाठून गाडी चोरल्याबाबत विचारणा केली. या प्रकाराने संतापलेल्या उत्कृर्ष आणि त्याच्या मित्राने दीपक टवलाकर याला मारहाण केली आणि काचा फोडून वाहनाला पेटवून दिले.
आगीत वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या प्रकाराची तक्रार दीपक टवलाकर यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी उत्कर्ष नागासे याला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.