Car Accident: शिंगणापूर घाटात  (Shinganapur Ghat) कार दरीत कोळल्यानं मोठा अपघात घडलाय. या अपघात मायलेकाचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना सोमवारी घडलीय. नातेपुते पोलीस ठाण्यात (Natepute Police Station) अपघाताची नोंद करण्यात आलीय. पोलिसांनी दोघांच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. दरम्यान मायलेकरांचा अपघाती मृत्यू झाल्यानं थदाळे गावावर शोककळा पसरली आहे.


गजानन सर्जेराव वावरे (वय-58) आणि हिराबाई सर्जेराव वावरे अशी मृतांची नावे आहेत. गजानन हे थदाळे येथे वास्तव्यास असून महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस होते. गजानन आणि हिराबाई हे दोघे मायलेक सोमवारी थदाळे येथून सोसायटीच्या मतदानासाठी नाशिककडे निघाले होते. दरम्यान, शिंगणापूर- नातेपुते मार्गावरील भवानी घाटातून जात असताना वावरे यांचा कारवरील ताबा सुटला आणि कार सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गजानन आणि त्यांची आई हिराबाई यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झालाय. 


या घटनेची माहिती मिळताच शिंगणापूर व पिंपरी येथील 30 ते 40 साहसी युवक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, मदतीसाठी धावून आलेल्या युवकांनी 400 फूट खोल दरीत उतरून दोन्ही मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून दोरखंड आणि मानवी साखळीच्या मदतीनं दरीतून वर काढले. गजानन वावरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अपघाताची नोंद नातेपुते पोलीस ठाण्यात झाली असून नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय. याप्रकरणी नातेपुते पोलीस पुढील तपास करीत आहेत. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha