मुंबई : मुंबईतील वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लवकरच कॅमेरे लावले जाणार आहेत. गेल्या काही दिवसात पोलिसांवरील वाढलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून हा प्रस्ताव शासनाला पाठवला जाणार आहे.

 

गेल्या आठवड्यात पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानंतरही ठाणे, कल्याणसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी पोलिसांवर हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या गणवेशावर लवकरच कॅमेरा लावण्यात येणार आहे.

 

पोलिसांच्या गणवेशावरील कॅमेऱ्यात नागरिकांचं पोलिसांसोबतचं संभाषणही रेकॉर्ड केलं जाणार आहे. त्यामुळे पोलिसांकडे पुरावा म्हणून कॅमेऱ्यातील फुटेज आणि संभाषण संग्रहित राहणार आहे. तसंच पोलिसांच्या कामावरही लक्ष ठेवलं जाणार आहे.

 

सध्या हैदराबाद आणि दिल्लीमध्ये वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांच्या गणवेशावर कॅमेरा असलेलं हैदराबाद हे भारतातील पहिलं शहर आहे. मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दिल्लीत एका पोलिसाने महिलेवर वीट भिरकावल्यानंतर दिल्ली वाहतूक पोलिसांच्या गणवेशांवर कॅमेरे लावण्यात आले होते.