Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर बोलून वादाची मालिकाच सुरु केलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. कागल बस स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आरएसएस पुरस्कृत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाची त्यांनी सुपारीच घेतली आहे. आरएसएस पुरस्कृत असलेल्या भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचीही भर पडली आहे. महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही.
कोश्यारींना मागे बोलवा
प्रताप उर्फ भैय्या माने पुढे म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) हे राज्यपाल पदापेक्षा आरएसएसचा अजेंडाच नेटाने राबवत आहेत. केंद्र सरकारने त्यांना परत बोलावून घेऊन आरएसएसच्या पूर्णवेळ कामासाठी राज्यपाल पदातून मुक्त करावे.
यावेळी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक प्रवीण काळबर, सुनील भिऊंगडे, रणजित पाटील, उत्तम कांबळे, बच्चन कांबळे, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ, राहूल पाटील, शहानूर पखाली, संग्राम लाड, राहूल चौगुले, गुलाब गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाले होते कोश्यारी?
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ पार पडला, यावेळी बोलतांना कोश्यारी यांनी हे विधान केले. त्यांच्या याच विधानाला आता विरोध होत आहे.
कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा
राज्यपाल यांच्या विधानावरून राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह संभाजीराजे यांच्याकडून निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर टीका देखील करण्यात येत आहे.
शिवरायांचा अपमान भाजपला मान्य आहे का?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफिच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे भाजप प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. औरंगजेबाची माफी शिवाजी महाराजांनी मागितली असं विधान भाजपच्या प्रवक्त्यांनी केलंय, हे भाजपला मान्य आहे का? असा सवाल करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी राज्यपालांना पुन्हा माघारी पाठवण्याची मागणीदेखील राऊत यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या