पंढरपूर : एकबाजूला कर्नाटक व महाराष्ट्रातील नेते सीमा प्रश्नावरून एकमेकांवर तोंडसुख घेत असताना महाराष्ट्र पोलीस मात्र कर्नाटक पोलिसांच्या मदतीला नुसते धाऊनच आले नाहीत तर चोरीला गेलेले 12 किलो सोनेही आरोपीसह परत मिळवून दिले आहे. कर्नाटकमधील बंगळुरु येथील संस्कार एंटरप्राइजेस या गोल्ड रिफायनरीमध्ये 12 किलो सोन्याची चोरी झाली होती. पोलिसांनी आरोपील अटक करुन या कंपनीचं सोनंही परत मिळवून दिलं आहे.
सांगोला तालुक्यातील मांजरी येथील स्वप्नील घाडगे हा संस्कार एंटरप्राइजेस या गोल्ड रिफायनरीमध्ये कामाला होता. या कंपनीतील 12 किलो 700 ग्राम सोन्याची चोरी 28 जानेवारी रोजी झाली होती. घटनेची माहिती मिळताच शोधाशोध सुरू झाल्यावर हा स्वप्नील घाडगे गायब असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यांनी बंगळुरु येथील विल्सन गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बेंगलोरचे पोलीस पथक 2 खाजगी गाड्या घेऊन सांगोला येथे दाखल झाले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनांनुसार सांगोला पोलिसांनी मांजरी येथून स्वप्नील यास ताब्यात घेतले.
मात्र स्वप्निल बोलण्यास तयार होत नव्हता. मग पोलिसांनी इंगा दाखवल्यावर त्याने गावातील नुकताच निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्याचे नाव घेतले. त्या सदस्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता स्वप्निल 28 जानेवारीला बंगळुरु येथून लक्झरी बसने कोल्हापूर येथे आला होता. त्याने या सदस्याला कोल्हापूर येथे बोलावून घेतले.
पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर त्याने रात्रीपर्यंत जवळपास 6 कोटी 26 लाख पन्नास हजाराचे शुद्ध सोने पोलिसांना काढून दिले. यामध्ये गावातील एका सराफावर पोलिसांचा संशय असून अजून 8 लाखाचे सोने मिळणे बाकी आहे. कर्नाटक पोलीस पथकासोबत सांगोला येथील सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या टीमने एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने रिकव्हर केले आहे. उरलेले सोने व त्या सराफाचा शोध आटपाडी परिसरात सुरू केला आहे. सांगोला पोलिसांनी केलेल्या कामामुळे या सोने चोरीतील आरोपी व मुद्देमाल कर्नाटक पोलिसांनी एवढ्या तडकाफडकी मिळू शकला आहे.