मुंबई : बारमध्ये मद्यपान करताना अव्वाच्या सव्वा रक्कम बारमालकांकडून आकारली जात असल्यामुळे नाराज मद्यप्रेमींना दिलासा मिळणार आहे. बारमध्ये लवकरच एमआरपीमध्ये दारु विकत घेणं शक्य होणार आहे. राज्य सरकार याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात आहे.


राज्यातील बारना FL 2 परवाना जारी करण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्याची तयारी आहे. यामुळे उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ होण्याचा सरकारचा अंदाज आहे.

एफएल 2 परवाना मद्य विक्रीची परवानगी देतो, मात्र परिसरात मद्यपान करता येत नाही. सध्या बार आणि परमिट रुम्सना एफएल 3 परवाना दिला जातो. म्हणजेच फक्त अल्कोहोल सर्व्ह करण्याचं लायसन्स.

'आता मद्यप्रेमी बारमधून दारु एमआरपीमध्ये विकत घेऊ शकतात. त्यानंतर हवं त्या ठिकाणी मद्यपान करु शकतात.' असं महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वाईन शॉपमालकांना मात्र या निर्णयाची धास्ती वाटत आहे. आपल्या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वाईन शॉपधारकांनी व्यक्त केली आहे. वाईन शॉप संघटनांनी याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारने एक्साईज ड्युटीतून 15 हजार कोटी रुपये मिळवण्याचं लक्ष ठरवलं होतं. जानेवारी अखरेपर्यंत 23 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत.

'प्रस्ताव विचाराधीन असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अवैध मद्यविक्री कमी करुन राज्य सरकारचं महसूल वाढवण्याचं उद्दिष्ट आहे' अशी माहिती उत्पादन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

सध्या बार दारुवर 5 टक्के व्हॅट आकारतात. एफएल 2 परवाना दिल्यावर व्हॅट नाहीसा होईल, असं बावनकुळे म्हणाले.