महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग आठ तास बंद, अंबेनळी घाटात कोसळलेली बस काढणार
एबीपी माझा वेब टीम | 06 Oct 2018 10:55 AM (IST)
या बसमधील विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताला दोन महिने उलटल्यानंतर आज ही बस दरीतून बाहेर काढली जाणार आहे.
सातारा : महाबळेश्वर ते पोलादपूर मार्ग आज आठ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. दापोली कृषी विद्यापीठाची बस 28 जुलै 2018 रोजी अंबेनळी घाटातील 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळली होती. या बसमधील विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज ही बस दरीतून बाहेर काढली जाणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळण्याची शक्यता आहे. विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. मात्र अपघाताचं नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही आणि त्यामुळे आता या बसची तपासणी केल्यावर कदाचित या अपघाताचं तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे. या अपघातात प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कर्मचारी बचावले. सावंत देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले. बस चांगल्या स्थितीत होती. अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते, असं त्यांचं म्हणणं आहे. पण सावंत देसाई हेच बस चालवत होते, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी सावंत देसाई यांच्यावर जो आरोप केला होता, त्यावर ते आजही ठाम आहेत. सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर स्टेअरिंगचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संबंधित बातम्या :