मुंबई/रायगड/कोल्हापूर: रस्ते वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे, सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना घडताना दिसून येतात. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. आजचा रविवार हा अपघातवार ठरला असून दिवसभरात अपघाताच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघाताची घटना घडली असून त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर, सायंकाळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याजवळील निपाणी येथे कंटेनवर, चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. तसेच, रायगड (Raigad) जिल्ह्यातील कोंझर घाटात बस दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील (Bus) सर्वच प्रवासी सुखरुप आहेत. या बसमधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. 


पुणे-बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघाताची घटना सांयकाळी घडली. कंटेनर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकमेकांना धडक बसून विचित्र आणि तितकाच भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू  झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, रायगड जिल्ह्यातही बस 20 ते 25 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. 


रायगडमध्ये बस दरीत कोसळली


रायगडमधील कोंझर घाटात एका बसाला अपघात झाला आहे. ही बस कोंझरवरून मुंबईच्या दिशेला जात असताना रस्त्याच्या बाजूला चिखलात घसरल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच  कोंझर गावातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गाडीमधून अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बसमध्ये दहा महिला व 10 लहान मुले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रस्त्यालगत गेलेल्या या जागेवर चिखल असल्याने गाडी फार दूर गेली नसल्याची माहिती आहे. झाडाचा आधार घेत बस चालकाने बस सुरक्षितपणे थांबवण्याचा प्रयत्न केला. बसमधील सर्वच प्रवाशांना  सुखरूप गाडीतून बाहेर काढून रस्त्यावर आणण्यात आले आहे. स्थानिकांनी घाबरेल्या प्रवाशांना धीर दिला.


धुळे जिल्ह्यातील अपघातात 4 जणांचा मृत्यू 


धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. येथील दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भयंकर होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम आटपून परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकपने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जण गंभीर गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.


हेही वाचा


मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी